अमरावती : शहर कोतवाली पोलिस ठाण्यासमोरील शेरे पंजाब बार अँड रेस्टॉरंटमध्ये कार्यरत कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. संतोष त्र्यंबक सोनसळे (४७, रा. हमालपुरा) असे मृताचे नाव आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. कोतवाली पोलिसांनी मृताच्या मुलाच्या तक्रारीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष सोनसळे हे अनेक वर्षांपासून शेरे पंजाब बार अँड रेस्टॉरंटमध्ये काम करीत होते. ते रोज सकाळी सातच्या सुमारास शेरे पंजाब बार अँड रेस्टॉरंटमध्ये पोहोचायचे. त्यानुसार शुक्रवारी देखील ते त्यांच्या ठरलेल्या वेळेवर पोहोचले. मात्र, त्यांनी हॉटेल आतमधून बंद करीत आत्महत्या केली.
दरम्यान, सकाळी हॉटेल उघडण्यात आले नाही, अशी माहिती संचालकाला मिळाल्याने ते तेथे पोहोचले. त्यापूर्वी त्यांनी संतोष यांच्या मोबाइलवर अनेक कॉल केले. मात्र, कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी संतोष यांच्या मुलाला कॉल केला. वडील सकाळीच घरातून हॉटेलसाठी बाहेर पडल्याची माहिती त्यांच्या मुलाकडून देण्यात आली. त्यामुळे मालक हॉटेलमध्ये लागलीच दाखल झाले.
त्यानंतर पहिल्या मजल्यावरील पंख्याला कपड्याच्या साहाय्याने संतोष यांनी गळफास घेतल्याचे त्यांना दिसले. त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती ही संतोष यांच्या कुटुंबीयांसह शहर कोतवाली पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जात पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला. डॉक्टरांनी तपासून संतोष यांना मृत घोषित केले.
पंखा तुटल्यावरही पुन्हा गळफास !
हॉटेलमध्ये असलेल्या सीसीटीव्हीमुळे संतोष यांनी नेमकी आत्महत्या कशी केली, ते उघड झाले आहे. नेहमीप्रमाणे सकाळी हॉटेलमध्ये पोहोचताच संतोष यांनी तिथे पाच ते सहा वेळा गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या दरम्यान पंखादेखील तुटला. मात्र, सातव्या वेळी संतोष यांनी आत्मघात करूनच घेतला. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.