गोंदिया : फेसबुकवर झालेल्या मैत्रीतून एका मेकॅनिकल इंजिनियरने शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविण्याचा प्रयत्न केला आणि तब्बल १८ लाख १९ हजार ४४ रूपये गमावून बसला. त्यानंतर हतबल होऊन त्याने तिरोडा पोलिसात शनिवारी तक्रार दाखल केली.
शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून नफा कमवून देण्याच्या नावावर दोन वर्षांपासून फेसबुकवर मित्र असलेल्या व्यक्तीने त्यांना फसवले आहे. वर्धनराज एस (रा. अशोकनगर, चेन्नई) असे आरोपीचे नाव आहे.
तिरोडा तालुक्यातील ठाणेगाव येथील फेकचंद नकटू पटले हा तरूण ओमान देशात मागील १४ वर्षापासून मेकॅनिकल इंजिनियर म्हणून कार्यरत आहेत. फेकचंद पटले ओमान देशातून आपल्या ठाणेगाव या गावी येतात व सुटी संपल्यानतर परत कामावर ओमान येथे जातात. ओमान येथे ते फेसबुकच्या माध्यमातून वर्धराजन यांच्या निफ्टीबाबतच्या पोस्ट बघायचे. त्यानुसार २९ नोव्हेंबर २०२१ मध्ये पटले यांनी वर्धराजन याला फेसबुकवर मेसेज पाठविले. वर्धराजन यांच्याशी व्हॉट्सअॅपवर सर्व माहिती विचारली.
वर्धराजनने तुम्ही मला आपले डिमॅट अकाउंट वापरु दिल्यास तुम्हाला स्टॉक मार्केट मध्ये भरपूर फायदा करुन देऊ शकतो, असे आमिष दाखवले. तसेच त्यातील १० टक्के रक्कम अकाऊंटवर टाकण्याचे तसेच जर कॅपिटल अमाऊंटचे नुकसान झाले तर तो अमाऊंट रिकव्हर झाल्यावर होणाऱ्या नफ्याचे ३० टक्के वर्धराजन यांना देण्याचे दोघांत ठरले. फेकचंद पटले यांना नफा मिळवून देण्याचे आमिष देत वर्धराजन याने त्यांची १८ लाख १९ हजार ४४ रुपयांनी फसवणूक केली.