लोणार (बुलढाणा): खटकेश्वरनगर (ता. लोणार) येथील अनिल कायंदे यांच्या घरात २३ डिसेंबर २०२४ रोजी दिवसाढवळ्या झालेल्या घरफोडीतील आरोपी घरातील मोलकरीण आणि तिचे सहकारी असल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात उघड झाली आहे. लोणार पोलिसांनी उपरोक्त गुन्ह्याचा उलगडा केला असून तिन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्या ताब्यातून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
लोणार शहरातील खटकेश्वरनगर परिसरात राहणारे शिक्षक अनिल हिंमतराव कायंदे (४५) व त्यांच्या शिक्षिका पत्नी २३ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी नेहमीप्रमाणे शाळेत गेले होते. सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास दोघेही घरी परतले असता त्यांना घराच्या दरवाजाचा कडीकोंडा तुटलेला दिसला. घराच्या वरच्या मजल्यावरील बेडरूममध्ये ठेवलेले कपाटाचे लॉक तोडून कपाटातील सामान अस्ताव्यस्त पडलेले आणि कपाटात ठेवलेले सोन्याचे झुंबर (वजन अंदाजे १ तोळा) व रोख १० हजार रुपये असा एकूण ६३ हजार रुपयांचा ऐवज लंपास झाल्याचे दिसले.
याप्रकरणी अनिल कायंदे यांनी लोणार पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात घरफोड्यांविरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या कलम ३०५, ३३१ (३) अन्वये ये गुन्हा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपास अधिकाऱ्यांनी अनिल कायंदे यांच्या घराशेजारी राहणाऱ्या नव्हे, तर त्यांच्या घरात साफसफाईचे काम करणाऱ्या नसीम उर्फ फरजानबी शेख जाकीर (३६, रा. गौसियानगर) हिची चौकशी केली असता तिचे वर्तन संशयास्पद वाटले. त्यामुळे पोलिसांनी तिची गोपनीय तसेच तांत्रिक माहिती काढली असता नसीम प्रकरणात शेख जाकीर हिनेच शेख वसीम शेख कादीर (३४), शेख हसीन शेख गुलाम (४२, दोन्ही रा. गौसियानगर) यांच्या मदतीने घरफोडी केल्याचे तपासात उघड झाले. आरोपींकडून त्यांनी गुन्ह्यात चोरलेला ऐवज जप्त करण्यात आला. पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक निमिष मेहेत्रे यांच्या नेतृत्वात पोलीस अंमलदार संतोष चव्हाण, संजय जाधव, अनिल शिंदे, ज्ञानेश्वर निकस व गजानन डोईफोडे यांनी ही कामगिरी बजावली.