नागपूर : महाराष्ट्र युवक काँग्रेस प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पोस्टरला काळं फासल्या प्रकरणी कुणाल राऊत यांना न्यायालयाकडून दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती. त्यानंतर नागपूर पोलिसांच्या वतीने कुणाल राऊत यांच्या कोठडीत आणखी वाढ करण्याची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने पोलिसांची मागणी फेटाळत राऊत यांना जामीन मंजूर केला.
नागपूर जिल्हा परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टरचे विद्रुपीकरण केल्याप्रकरणी नागपूर पोलिसांनी युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत यांना अटक केली होती. त्यानंतर कुणाल राऊत यांना सोमवारी सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. जिल्हा सत्र न्यायालयाकडून कुणाल राऊत यांना कोणताही दिलासा न मिळाल्याने त्यांना आणखी दोन दिवस पोलीस कोठडीत राहावे लागले होते. त्यानंतर राऊत यांनी जामीनासाठी अर्ज केला होता. तर नागपूर पोलिसांनी राऊत यांच्या कोठडीत आणखी वाढ करण्याची मागणी केली होती. या प्रकरणी नागपूर न्यायालयाने पोलिसांची मागणी फेटाळून कुणाल राऊतांना दिलासा दिला आहे.