नागपूर : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान पार पडले आहे. मात्र, या दरम्यान, काही ठिकाणी वादाच्या घटना घडल्या आहेत तर काही ठिकाणी तोडफोड करण्यात आली आहे. अशातच नागपूरमध्ये मतदानानंतर ईव्हीएम मशीन घेऊन जाणाऱ्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर विधानसभा क्षेत्रातील किल्ला परिसरात बुथ क्रमांक 268 मधून बुधवारी सायंकाळी ही घटना घडली आहे. या परिसरामधून ईव्हीएम मशीन घेऊन जाणारी तवेरा गाडी मतदान केंद्रातून बाहेर निघाली होती, तेव्हा त्या गाडीवर हल्ला करण्यात आला. त्यावेळी परिसरातील दक्ष नागरिक आणि काही भाजप कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप केला आणि पोलीसांना बोलावून घेतलं. मात्र, तोपर्यंत हल्लेखोरांनी दगड आणि लोखंडी रॉड्सने हल्ला करत ईव्हीम मशीन घेऊन जाणा-या तवेरा गाडीची जबर तोडफोड केली.
याप्रकरणी पोलीसांना माहिती मिळताच लगेच पोलीस घटनास्थळी धाव घेतली आणि ईव्हीएम तसेच तवेरा गाडीमधील शासकीय कर्मचा-यांना सुरक्षित बाहेर काढलं. यानंतर ही गाडी पोलिस ठाण्यात आणण्यात आली. व गाडीतील मशीन सुरक्षित स्थळी नेण्यात आले.
दरम्यान, या घटनेनंतर कोतवाली पोलीस स्टेशन समोर मोठ्या संख्येने भाजप आणि कॉंगेस कार्यकर्ते गोळा झाले होते. मात्र वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी कोतवाली पोलीस स्टेशनकडे धाव घेत सर्व कार्यकर्त्यांना बाहेर लावले. कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.