डोणगाव (बुलढाणा): कामानिमित्त मोटारसायकलने पारखेड येथे जाताना एकाला पाठीमागून टाटा मालवाहू वाहनाने धडक देत जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना पाथर्डी ते पारखेड फाटादरम्यान मंगळवारी, १३ ऑगस्ट रोजी घडली. जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी हा कट रचण्यात आला. याप्रकरणी चार जणांविरुद्ध जानेफळ पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे.
मेहकर तालुक्यातील पाथर्डी येथील मोतीलाल हिरालाल चव्हाण (२९) हे आपल्या मोटारसायकलने पाथर्डी येथून पारखेड फाट्याकडे निघाले होते. आरोपी पंकज प्रकाश चव्हाण (३५) याने आपल्या ताब्यातील मालवाहू टाटा वाहन (क्रमांक एमएच-३०-बीडी-१४७६) या वाहनाने मोतीलाल चव्हाण यांच्या मोटारसायकलला पाठीमागून धडक दिली. ते रस्त्यावर पडताच आरोपीने वाहनातून उतरून ‘तू नेहमीच आमच्याशी खेटे घेतो, आज तुला कायमचेच संपून टाकतो’ असे धमकावले. रोहिदास जाधव यानेसुद्धा मालवाहू टाटा गाडी सुरू करून पुन्हा अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला.
यावेळी त्याच्यासोबत धीरज प्रकाश जाधव, ऋतिक देवीदास जाधव, विशाल रोहिदास जाधव हेसुद्धा होते. याप्रकरणी पोलिसांनी पंकज प्रकाश जाधव, धीरज प्रकाश जाधव, ऋतिक देवीदास जाधव, विशाल रोहिदास जाधव (सर्व रा. पाथर्डी) यांच्याविरुद्ध कलम १०९, ३२४, (३) (५) नुसार गुन्हे दाखल केले. पुढील तपास ठाणेदार अजिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण व सहकारी करीत आहेत.
काही दिवसांपूर्वी पाथर्डी ग्रामपंचायतीमध्ये अविश्वास आणून सरपंचाला पायउतार व्हावे लागले होते. त्याचा वचपा काढण्यासाठी ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी वाद वाढू नये व अनुचित घटना घडू नये, याकरिता पोलीस प्रशासनाने तत्परता दाखवत वेळीच चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला. दंगाकाबू पथकही गावात पोहोचले. उपविभागीय अधिकाऱ्यांनी गावाला भेट दिली असून, ते परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.