अयनुद्दीन सोलंकी / घाटंजी (यवतमाळ) : आर्णी केळापूर भाजपाचे माजी आमदार राजू तोडसाम यांनी जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पांढरकवडा येथील निवडणूक निर्णय अधिकारी सुहास गाडे यांच्याकडे आज उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज भरण्यापुर्वी पांढरकवडा येथील मित्र क्रिडा मंडळाच्या मैदानावर छोटेखानी सभा आयोजित करण्यात आली.
दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रशेखर बावनकुळे हे पांढरकवडा येणार होते. परंतु, आज त्यांचा रामटेक व नागपूर जिल्ह्यात दौरा असल्याने ते येऊ शकले नाही. तर माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर हे पांढरकवडा येथे उशीरा पोहचले. या प्रसंगी भाजपाचे माजी यवतमाळ जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे यांनी भाजपा सरकारने केलेल्या कामाचा उहापोह करुन सविस्तर अशी माहिती दिली.
तसेच यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुबारक तंवर, भाजपाचे अमर दिनकर, राष्ट्रवादीचे सोनू उप्पलवार, आर्णी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राजू तोडसाम आदींचे भाषणे झाली. या वेळी उमेदवार राजू तोडसाम म्हणाले की, या पुर्वी केलेल्या कामाची सविस्तर माहिती देऊन, माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, यवतमाळचे माजी पालकमंत्री व आमदार मदन येरावार, लोकनेते अण्णासाहेब पारवेकर आदींमुळे मला आर्णी विधानसभा मतदारसंघात उमेदवारी मिळाली.
उमेदवारी अर्ज भरण्यापुर्वी पांढरकवडा येथील मित्र क्रिडा मंडळाच्या मैदानावरुन भव्य रॅली काढण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी (80) सुहास गाडे यांच्या कडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी माजी आमदार राजू तोडसाम हे महाराष्ट्र प्रदेश भाजपा प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपा मध्ये प्रवेश केला होता.