नागपूर : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या इंस्टाग्रामवरून ओळख झालेल्या एका युवकाने तरुणीला घरी नेऊन वारंवार बलात्कार केला. तिला लग्न करण्याचे आमिष दाखवले. मात्र, त्यानंतर लग्न करण्यास नकार दिला. या प्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून युवकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून अमित सुमित मालेवार (29, बजाजनगर) असे आरोपीचे नाव आहे.
पीडित 25 वर्षीय तरुणी ही एका खासगी कंपनीत नोकरी करते. इंस्टाग्रामवरून तिची ओळख अमित मालेवार याच्याशी झाली. अमित हा मूळचा भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील असून तो देखील नागपुरात एका खासगी कंपनीत नोकरी करतो. दोघांचा नेहमी मोबाईलवरून संवाद होत होता. त्यानंतर दोघांच्या नियमित भेटी व्हायला लागल्या. अमितने 21 डिसेंबर 2021 ला सदर तरुणीला वाढदिवस असल्याचे सांगून बजाजनगरातील भाड्याने घेतलेल्या घरी नेले. तेथे गेल्यानंतर घरात कुणीच दिसले नाही. काही वेळातच अमितने बाहेरून जेवन मागविले. त्यानंतर त्याने तरुणीला शारीरिक संबंधाची मागणी केली. तरुणीने नकार दिला असता अमितने तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तासाभरात तरुणी रागाच्या भरात घरी निघून गेली. काही दिवस दोघांचे एकमेकांशी बोलणे बंद होते.
25 जानेवारीला अमित हा तरुणीच्या कार्यालयात गेला. त्याने तेथे तिची भेट घेऊन माफी मागितली. त्यानंतर तिला बाहेर फिरण्यासाठी घेऊन गेला. काही दिवसानंतर त्याने पुन्हा तिला घरी नेले आणि शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. तरुणीने नकार देताच तिला लग्न करण्याचे आमिष दाखवले. त्याने लग्न करण्याची तयारी दर्शविल्यामुळे दोघेही वारंवार शारीरिक संबंध ठेवत होते. दिवाळीमध्ये तरुणीने अमितला लग्नाबाबत कुटुंबियांशी चर्चा करण्यासाठी बोलावले. मात्र, त्याने बहाणा करून टाळाटाळ केली. त्यानंतर तो लग्नास नकार देऊन तरुणीचे लैंगिक शोषण करायला लागला. त्यामुळे कंटाळलेल्या तरुणीने बजाजनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून लवकरच अमितला अटक करण्यात येणार आहे.