नागपूर: आरोपीने बेसा येथील प्लॉट न देता दोन ग्राहकांची २० लाख रुपयांनी फसवणूक केल्याची घटना घडली असून सीताबर्डी पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रशांत गजानन ताटीवार (रा. रामदासपेठ) व शैलेंद्र मनोहर पुल्लीवार (रा. फेड्स ले-आउट, दीनदयालनगर) अशी आरोपींची नावे आहेत. भरत रणछोडदास ठक्कर (६१, रा. रामदासपेठ, लेन्ड्रापार्कजवळ ) असे फिर्यादीचे नाव आहे.
फिर्यादी ठक्कर यांची ओळख आरोपी प्रशांत ताटीवार यांच्यासोबत होती. आरोपीने ठक्कर यांना त्याची बेसा येथे जमीन असून त्या जमिनीवर त्याने आरोपी शैलेंद्र पुल्लीवार याच्यासोबत ले-आउट टाकला आहे. तुम्ही तेथे गुंतवणूक करा, असे बोलून ठक्कर यांना बेसा येथे जमिनीवरील प्लॉट दाखविले. ठक्कर यांना जागा पसंत आल्याने त्यांनी त्या ले-आउटमधील प्लॉट नं. ४४ व ४५ एकूण ३,८७५ वर्गफुटाचे पसंत केले. तसेच ठक्कर यांचे परिचित डॉ. अविनाश दत्तात्रय देशमुख (३८, रा. डोंगरे ले-आउट, नागपूर) यांनासुद्धा ले-आउट दाखविल्याने त्यांनी ले-आउटमधील प्लॉट नं. ६४ व ६५ बुक केले. आरोपींनी फिर्यादी ठक्कर यांच्या मोदी नं. १ येथील ऑफिसमध्ये येऊन त्यांच्याकडून धनादेशाद्वारे १० लाख रुपये व त्यांचे मित्र डॉ. देशमुख यांच्याकडून ५ लाख रुपये रोख व ५ लाख धनादेशाद्वारे असे १० लाख रुपये घेतले. आरोपींनी फिर्यादी व मित्रास करारनामा करून दिला.
आरोपींनी सहा महिन्यात ले-आउट एन.ए झाल्यावर विक्रीपत्र व इतर कागदपत्रे तयार करून देण्याचे आश्वासन दिले. फिर्यादी ठक्कर यांनी आरोपीला वारंवार विचारणा केली असता काम चालू आहे, असे सांगून टाळाटाळ केली. फिर्यादी ठक्कर यांनी जून २०२३ मध्ये विचारले असता आरोपींनी जे करायचे ते करा, प्लॉट देत नाही, पैसे विसरून जा, असे म्हणून धमकी दिली. आरोपींनी फिर्यादी ठक्करसोबत करारनामा केलेले प्लॉट दुसरे कोणालातरी विक्री केल्याचे फिर्यादीस समजले. आरोपींनी संगनमत करून २८ जुलै २००७ ते १९ ऑगस्ट २०२४ पर्यंत फिर्यादी व मित्राकडून एकूण २० लाख रुपये घेऊन कोणताही प्लॉट दिला नाही व पैसे परत न देता फिर्यादी ठक्कर यांची आर्थिक फसवणूक केली. फिर्यादी ठक्कर यांनी दिलेल्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.