अमरावती : ‘तुझ्या पतीला घाबरू नको, मी तुझ्यासोबत आहे. तुझ्या पतीला घटस्फोट दे, मी तुला व तुझ्या मुलांना सांभाळतो’ असे आमिष दाखवून एका विवाहितेवर वारंवार अत्याचार करण्यात आला. ही घटना रविवार, ४ ऑगस्ट रोजी यवदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणी पीडित विवाहितेच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
मनोज जियालाल मलिये (३२) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित ३२ वर्षीय विवाहितेचे मनोज याच्यासोबत प्रेमसंबंध होते. या काळात मनोजने तुझ्या पतीला घाबरू नको, मी तुझ्यासोबत आहे, असा विश्वास त्यांना दिला. पतीला घटस्फोट दे, असा आग्रह त्याने त्यांच्याकडे केला. घटस्फोटानंतर तुझ्यासह तुझ्या मुलांनासुद्धा सांभाळतो, लग्नदेखील करतो, अशी बतावणी त्याने केली. त्यानंतर त्याने त्यांना लग्नाचे आमिष दाखवून वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र, त्यानंतर तो त्यांना टाळू लागला. आपला विश्वासघात झाल्याचे लक्षात येताच पीडित विवाहितेने येवदा पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी मनोजविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.