अमरावती : अमरावतीमध्ये शेतकर्यांना बोगस डीएपी खतांची विक्री करणाऱ्या आणि मिश्र खतांच्या नावाखाली माती विकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान, शेतकर्यांच्या कष्टाची माती करणाऱ्या या कंपनीवर अमरावती कृषी विभागाने मोठी कारवाई केली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गासह बोगस खते आणि बियाणे विकणार्यामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
अशा प्रकारावर आला बसण्यासाठी कडक कारवाई करण्याची मागणी शेतकरी वर्गातून जोर धरू लागली आहे. याप्रकरणी पुण्यातील रामा फर्टिकेम कंपनीच्या विकास नलावडे विरुद्ध अमरावती शहर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यातील मंगरूळ चव्हाळा येथे हा प्रकार घडला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मंगरूळ चव्हाळा येथील एका कृषी केंद्रातील खताचे नमुने घेतले होते. त्याचा अहवाल आल्यानंतर त्यामध्ये माती असल्याचे उघडकीस आले आहे.
दरम्यान, पुणे येथील खत निर्माण करणारी रामा फर्टीकेम लिमिटेड या कंपनीने अमरावती जिल्ह्यात 3 हजार 300 बॅग डीएपी आणि 10 : 26 : 26 या खताच्या 2100 बॅग अशा 5 हजार 400 खतांच्या बॅगची विक्री केली आहे. यामध्ये अनेक नमुने हे चुकीचे आढळले असून 453 खतांची पोती जप्त करण्यात आली आहेत. तर खत विक्री करणाऱ्या कंपनी आणि विक्री करणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचे अमरावती कृषी विभागाने सांगितले आहे.