वाशिम : वाशिममध्ये एक ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. शेतात फवारणीसाठी गेलेल्या दोन सख्ख्या चुलत भावांसह वडिलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना १२ जुलै रोजी संध्याकाळच्या सुमारास वाशिमच्या मंगरूळपीर तालुक्यातील पांगरी महादेव गावात घडली आहे. अशोक माणिक पवार (वय-38) वडील, मारोती अशोक पवार (वय-20) मुलगा, आणि दत्ता राजू पवार (वय-18) पुतण्या अशी मृत्यूमुखी पडलेल्या तिघांची नावे आहेत. या घनटेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, वाशिमच्या मंगरूळपीर तालुक्यातील पांगरी महादेव गावातील शेत शिवारात शेतात पिकाची फवारणी करण्यासाठी गेलेल्या दोन सख्या चुलत भावांसह वडिलांना विद्युत तारेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे. शेतात फवारणी करण्यासाठी गेले असता विद्युत तारा तुटून जमिनीवर पडल्याचं दोन्ही भावाच्या लक्षात न आल्याने ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
दोन्ही भाऊ उशिरापर्यंत घरी का नाही आले, हे बघण्यासाठी वडील घटनास्थळी गेले असता त्यांनाही विद्युत तारेचा धक्का लागला आणि त्यांचाही मृत्यू झाला. या घटनेनंतर स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत विद्युत विभागाला याबाबत माहिती दिली.
दरम्यान, विजेचा धक्का लागून कुटुंबातील तिन्ही कर्त्या पुरुषांचा मृत्यू झाल्याने पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर, महावितरण विभागाच्या कारभारावर ग्रामस्थांकडून संताप व्यक्त केला जात आहे. मंगरूळपीर पोलिसांनी पंचनामा करण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास पोलीस करत आहेत. या घटनेनं गावावर शोककळा पसरली आहे.