नागपूर : सुनील केदार यांची आमदारकी रद्द झाल्यानंतर आणि तुरुंगवास झाल्यानंतर त्यांची जागा रिक्त झाली. त्यामुळे त्या जागेसाठी विधानसभा पोटनिवडणुकीची चर्चा आता सुरु झाली आहे. सावनेर विधानसभा क्षेत्रात पोटनिवडणूक घेतली जाईल अशी शक्यता बळावली आहे. राजकीय वर्तुळात देखील तशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे पुढच्या काही आठवड्यात यासंदर्भात काही हालचाली होऊ शकतात.
नागपूर जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी सुनील केदार यांना 22 जानेवारीला पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. त्यानंतर सुनील केदार यांचे नियमानुसार विधानसभेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. त्यानंतर लगेचच विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचे वारे वाहायला लागले आहेत. उमेदवारीवरून दावे- प्रतिदावे सुरु झाले आहेत.
दरम्यान यापूर्वी पुणे लोकसभा आणि चंद्रपूर लोकसभेची जागा खासदारांच्या निधनामुळे रिक्त झाल्यानंतरही जवळपास एवढाच कालावधी शिल्लक असताना पोटनिवडणूक घेण्यात आली नव्हती. त्यामुळे सावनेर मधील पोटनिवडणूक घेतली जाईल का हा ही प्रश्न कायम आहे.