बुलढाणा : बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील मोताळा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष सुनील कोल्हे यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा हल्ला करण्यात आला. ही घटना मोताळा तालुक्यातील तालखेड ते तालखेड फाटा दरम्यान घडली आहे. याघटनेमुळे बुलढाणा विधानसभा मतदारसंघाच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी मोताळा तालुक्यातील तालखेड आणि तालखेड फाट्याच्या मध्ये हा हल्ला झाला. यावेळी हल्लेखोर तोंडावर रूमाल बांधून आले होते. दोन वेगवेगळ्या बाईकवरून आलेल्या चार जणांनी रॉडने सुनील कोल्हे यांच्यावर हल्ला चढविला. यात सुनील कोल्हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांचा डावा पाय आणि डावा हात फ्रॅक्चर झाला असल्याची माहिती आहे. त्यांना जिल्हा सामान्य रुग्ण्यालयात उपचारासाठी नेण्यात आले. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या तथा नुकतेच पार पडलेल्या बुलढाणा विधानसभेच्या निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री शेळके या जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्या. महाविकास आघाडीचे अन्य नेते, पदाधिकारी देखील रुग्णालयात दाखल झाले.
घटनेदरम्यान सुनील कोल्हे यांच्यावर चार जणांनी भ्याड हल्ला केला आहे. त्याचा मी निषेध करत असल्याचे मत या शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या जयश्री शेळके यांनी व्यक्त केलं आहे. तसेच महाविकास आघाडीचे ज्यांनी प्राणपणाने काम केले अशा लोकांवर प्राणघातक हल्ले केले जात असून निकाल लागल्याच्या दिवसापासून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या घरावर तलवारी घेऊन चाल करणे, ज्यांच्या घरावर बॅनर होते त्यांना मारहाण करणे तसेच धमकावण्याचे प्रकार सुरु असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
जिल्हा पोलीस प्रशासनाने अशा हल्लेखोरांना शोधून त्यांच्यावर तात्काळ कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे. बुलढाण्याचा बिहार करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून सुरू असून जिल्हा पोलिस अधीक्षकांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेण्याची मागणी जयश्री शेळके यांनी केली आहे. दरम्यान, पोलीसही घटनास्थळी दाखल झाले असून हल्ला करणा-यांचा पोलीस तपास घेत आहेत.