अमरावती: चांदूर रेल्वे तालुक्यात प्रेमप्रकरणावरून झालेल्या वादातून (Crime News) अल्पवयीन मुलाने मुलीच्या वडिलांवर आणि काकांवर चाकूने हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे. या हल्ल्यात (Amravati News) दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रकरणी चांदूर रेल्वे पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, परिसरातील एका अल्पवयीन मुलगी आणि मुलामध्ये काही काळापासून प्रेमसंबंध होते. 12 फेब्रुवारीच्या रात्री मुलाने मुलीला फोन केला असता तो कॉल तिच्या वडिलांनी उचलला आणि प्रकरण उघड झाले. सामोपचाराने बोलणी करून विषय मिटवण्यासाठी वडिलांनी संबंधित मुलाला घरी बोलावले.
मात्र मुलगा एकटाच न येता भावासह आणि मित्रासोबत आला. सुरुवातीला चर्चा सुरू असताना वाद वाढला आणि रागाच्या भरात मुलाने चाकू काढून मुलीच्या वडिलांवर व काकांवर वार केले. झटापटीत दोन्ही बाजूंनी धक्काबुक्की झाली असून आरोपी मुलगादेखील जखमी झाला आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले.
पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून गुन्हा नोंदवला असून अल्पवयीन आरोपी आणि त्याच्या भावाविरुद्ध विविध कलमांखाली कारवाई करण्यात येत आहे. पुढील तपास सुरू आहे.







