Crime News: नागपूर : नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कालेश्वर गावातून एक अतिशय धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच सोळा वर्षीय सख्ख्या भावाने वारंवार लैंगिक अत्याचार (Sexual abuse) केल्याची संतापजनक घटना घडली आहे. ही पीडित मुलगी सातव्या इयत्तेत शिकत असून या अत्याचारांमुळे ती सहा महिन्यांची गर्भवती राहिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हे संपूर्ण प्रकरण तेव्हा उघडकीस आले जेव्हा ही मुलगी गेल्या काही दिवसांपासून वारंवार आजारी पडू लागली होती. तिच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्यामुळे घरच्यांनी तिला उपचारासाठी कळमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तिथे तपासणी करत असताना डॉक्टरांना संशय आला आणि वैद्यकीय चाचण्यांनंतर ती मुलगी गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तिला पुढील उपचारासाठी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे डॉक्टरांनी ती मुलगी सहा महिन्यांची गर्भवती असल्याचे निश्चित केले असून सध्या ती वैद्यकीय निरीक्षणाखाली आहे.
या घटनेच्या तपासातून समोर आलेली माहिती अधिकच चिंताजनक आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुलाला मोबाईल फोनवर अश्लील व्हिडिओ पाहण्याचे व्यसन जडले होते. या व्हिडिओंच्या प्रभावाखाली येऊन त्याने सुरुवातीला खेळाच्या बहाण्याने आपल्या बहिणीसोबत गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. हळूहळू या कृत्याचे स्वरूप बदलले आणि गेल्या अनेक महिन्यांपासून तो तिच्यावर अत्याचार करत होता. जेव्हा त्याचे आई-वडील कामाच्या निमित्ताने घराबाहेर जात असत, तेव्हा संधी साधून तो आपल्या बहिणीला लक्ष करत असे.

या प्रकरणी कळमेश्वर पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित आरोपी मुलाला ताब्यात घेतले आहे. त्याला बाल कल्याण समितीसमोर हजर करण्यात आले असून सध्या त्याची रवानगी सरकारी सुधारगृहात करण्यात आली आहे. मुलीचे वय खूपच कमी आहे आणि अशा परिस्थितीत गर्भधारणा तिच्या आरोग्यासाठी धोक्याची ठरू शकते. त्यामुळे मुलीच्या कुटुंबियांनी ही गर्भधारणा कायदेशीररित्या संपवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेण्याची तयारी सुरू केली आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून महिला व बाल विकास विभागाने दोन्ही भावंडांचे समुपदेशन करण्यासाठी जिल्हा बाल संरक्षण पथकाला पाचारण केले आहे.







