ब्रह्मपुरी (चंद्रपूर): प्रेमीयुगुलाने विजेच्या टॉवरला गळफास लावून आत्महत्या’ केल्याची खळबळजनक घटना ब्रह्मपुरी तालुक्यातील उचली येथे रविवारी, २ मार्चला उजेडात आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
रोहित रमेश लिंगायत (२४ वर्षे, रा. उचली) असे मृत युवकाचे तर गायत्री उर्फ सोनी अनिल गणवीर असे अल्पवयीन मुलीचे नाव आहे. दोघांचेही एकमेकांवर प्रेम होते. मात्र त्यांच्या आत्महत्येने खळबळ उड़ाली आहे. प्रेमीयुगुलाने आत्महत्या एक दिवसापूर्वीचं केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील उचली गावातील रोहित लिंगायत (२५) याची चांदली गावातील एका अल्पवयीन मुलीशी ओळख झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. या प्रेमप्रकरणातून दोघांनी टोकाचा निर्णय घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.
उचली गावातील स्मशानभूमीजवळ विजेचे टॉवर आहे. प्रेमीयुगुलाने संधी साधून या टॉवरला गळफास लावून आत्महत्या केली. टॉवरला ज्या स्थितीत प्रेमीयुगुलाचे शव आढळून आले, त्यावरून ही आत्महत्या एका दिवसापूर्वीच केल्याची शक्यता व्यक्त होत आहे. याबाबत पोलिसांकडून अधिक माहिती मिळू शकली नाही. ब्रह्मपुरी पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोघांचेही मृतदेह ताब्यात घेतले. तसेच उत्तरीय तपासणीसाठी ब्रह्मपुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.