योगेश मारणे
न्हावरे,ता. 3 : स्वारगेट बसस्थानक निर्भया प्रकरणातील संशयिताला पकडल्यानंतर आता गुणाट (gunat village) गावातून महत्त्वाची माहिती समोर येत आहे. गुणाट (ता.शिरूर) गावामध्ये बक्षीसावरून कोणताही श्रेयवाद सुरू नाही, तसेच गावकऱ्यांना बक्षिसाची गरजही नाही, असे गावातील ग्रामस्थ, तरुण व प्रमुख पदाधिकारी यांनी ‘पुणे प्राईम’शी बोलताना निक्षून सांगितले आहे.

स्वारगेट बसस्थानक निर्भया प्रकरणामुळे शिरूर तालुक्यातील गुणाट गावाचे नाव संपूर्ण राज्यात बदनाम झाले. केवळ त्या भावनेतूनच सर्व ग्रामस्थ व तरुणांनी संशयित दत्तात्रय गाडे याला पकडण्याच्या शोध मोहिमेत पोलिसांना मदत केली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी आपण स्वत: गुणाट गावात जाऊन संबंधितांचा सत्कार करणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र शोध मोहिमेत सहभागी झालेले तरुण व ग्रामस्थ यांनी संशयिताला पकडून देऊन बक्षिस मिळावे म्हणून काम केले नाही असेही ग्रामस्थांनी सांगितले.
गुणाट गावात संशयित गाडेला पकडून देण्याचा कोणताही श्रेयवाद नाही किंवा कोणालाही बक्षिसाची आवश्यकता नाही असेही गावातील पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. तथापि पुण्याच्या पोलिस आयुक्तांनी गावकऱ्यांना बक्षीस दिलेच तर ते सर्वानुमते स्वीकारले जाईल व गावामध्ये समाजकार्यासाठी वापरले जाईल असे गावातील काही ग्रामस्थांनी ‘पुणे प्राईम’शी बोलताना सांगितले.

गुणाट गावातील कोणतीही व्यक्ती वैयक्तिक बक्षीस स्वीकारणार नाही. त्यामुळे गुणाट गावात बक्षिस मिळवण्यासाठी कोणताही श्रेयवाद नाही. कोणीही गुणाट गावाची बदनामी करू नये असे,
– हनुमंत सोनावणे, पोलीस पाटील, गुणाटआरोपीला पकडून देणारे व आरोपीची माहिती देणारे गावातलेच असून, आम्ही ग्रामस्थ एकत्र आहोत. गावात दोन गट पडलेले नाहीत. गुणाट ग्रामस्थांनी केवळ गावाची बदनामी झाली या भावनेतूनच पोलीस प्रशासनाला मदत करण्यासाठी महत्त्वाची भूमिका घेतली आहे. पोलीस प्रशासनाने गुणाटमध्ये कोणाला बक्षीस दिलेच तर त्याचा वापर समाजकार्यासाठी केला जाईल. वैयक्तिक कोणीही बक्षिस स्वीकारणार नाही.
– रामदास काकडे, सरपंच, गुणाट







