नागपूर: सोमवारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जोरदार प्रत्युत्तर दिले. आम्ही घरात बसून व्हीसी घेत सूचना करत बसलो नाही. राज्यात जेव्हा पाऊस आला, संकट आलं तेव्हा आम्ही फिल्डवर गेलो. घरात बसून राहिलो नाही असं शिंदे यांनी म्हटलं आहे. तसेच लंडन दौऱ्यापेक्षा महाराष्ट्राचा दौरा केलेला कधीही चांगला, असं म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंनाही उत्तर दिलं.
ते २०१९ पासून मुख्यमंत्री म्हणून अडीच वर्षेत सत्तेत होते. त्यांनी आरोप करताना थोडं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणायच्या आधीच सांगतो की, मी पण त्या सत्तेत होतो. पण कॅप्टन महत्त्वाचा असतो. तो ज्या दिशेने जहाज नेतो त्याच दिशेने ते जातं. सांगायचं एवढंच की, गेल्या सरकारपेक्षा निम्म्या कालावधीत आम्ही अधिक पटीने मदत शेतकऱ्यांना दिली आहे. फक्त घोषणा करुन शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसलेली नाहीत. ३० जून २०२२ पासून आमचं सरकार सत्तेत आल्यानंतर पुढच्या आठवड्यात अतिवृष्टी झाली. तेव्हा आम्ही राज्याचा दौरा केला होता. त्यावेळी माझं कुटुंब माझी जबाबदारी म्हणून व्हीसीद्वारे आम्ही बैठका घेतल्या नाहीत. इतरांना सूचना देत बसलो नाही. आम्ही फिल्डवर जाऊन काम केलं असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
जर आपल्याला सातत्याने विचारणारं कुणीतरी आहे, असं लक्षात आलं की यंत्रणाही चांगलं काम करते. कलेक्टरही कामाला लागले. विरोधकांनी थोडं आत्मपरीक्षण करायला हवं. मुख्यमंत्री आणि आमचे सहकारी सतत दौऱ्यावर असतात असंही कोणीतरी म्हटलं. पण पोराटोरांना योग्य वयात समजावून सांगितलं की त्यांना बरोबर समज येते. लंडन दौऱ्यापेक्षा राज्याच्या कानाकोपऱ्यात गेलेलं कधीही चांगलं असतं, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला. कोव्हिड काळात जे आपल्या मतदार संघात गेले नाहीत, त्यांनी मला हे सांगू नये. मला नाईलाजाने हे सांगावं लागतं आहे, कारण तसे आरोप होत आहेत, त्यामुळे बोललो असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.