नागपूर : नागपूरचे खासदार नितीन गडकरी पंतप्रधान होऊ शकतात की नाही, याबद्दल अनेकदा चर्चा होत असतात. नितीन गडकरी यांच काम आणि असलेली क्लीन इमेज यामुळे पंतप्रधानपदासाठी त्यांच्या नावाची राजकीय वर्तुळात बऱ्याच वेळा चर्चा होत असते. याबाबत नितीन गडकरी यांनी नागपूरमधील एका कार्यक्रमात बोलताना एक महत्त्वाचा गौप्यस्फोट केला आहे. यावेळी त्यांनी आपल्याला विरोधी पक्षातील बड्या नेत्याकडून पंतप्रधानपदाची ऑफर देण्यात आल्याचे सांगितले. गडकरी यांच्या या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळ खळबळ उडाली असून अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
नागपूरमधील एका कार्यक्रमात नितीन गडकरी आपल्या नेहमीच्या शैलीत राजकीय फटकेबाजी करताना दिसून आले. त्यांनी म्हटले की, काही दिवसांपूर्वी एक घटना अचानक घडली. मी या घटनेमधील नेत्याचे नाव सांगत नाही. पण त्याने मला सांगितले होते की, तुम्ही पंतप्रधान होणार असाल तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ. पण त्यावर मी त्यांना विचारलं की, तुम्ही मला पंतप्रधानपदासाठी का पाठिंबा देणार आहात आणि मी तो पाठिंबा का घ्यावा? मी संबंधित नेत्याला स्पष्टपणे सांगितले की, पंतप्रधानपद हे माझ्या आयुष्यातील ध्येय नाही. मी माझ्या तत्वांशी आणि पक्षसंघटनेशी एकनिष्ठ आहे. मी पंतप्रधानपदासाठी या तत्त्वांशी आणि पक्षाशी प्रतारणा करणार नाही. ही तत्त्वं हीच भारतीय लोकशाहीची सर्वात मोठी ताकद आहे, असा गौप्यस्फोट नितीन गडकरी यांनी केला.
नितीन गडकरी यांनी पंतप्रधानपदाची ऑफर नाकारल्याचे स्पष्ट केले असले तरी यामुळे राष्ट्रीय स्तरावर आणि महाराष्ट्रातही पुन्हा एकदा गडकरींच्या नावाची चर्चा सुरु होऊ शकते. 2014 पासून नरेंद्र मोदी यांच्यानंतर भाजपमध्ये पंतप्रधानपदाचा दुसरा कोणताही दावेदार उभा राहिला नव्हता. भाजपमध्ये सबकुछ मोदी अशी एकंदर परिस्थिती आहे. मात्र, गेल्या काही काळापासून नरेंद्र मोदी यांच्यानंतर योगी आदित्यनाथ, अमित शाह यांच्या नावांची पंतप्रधानपदासाठी चर्चा होताना दिसत असते. यामध्ये आता नितीन गडकरी यांच्या नावाची भर पडली असून राष्ट्रीय स्तरावर नितीन गडकरी यांचे नाव उघडपणे पंतप्रधानपदाच्यादृष्टीने पुन्हा एकदा चर्चेत येण्याची चिन्हे आहेत.