Accident News : अमरावती : अमरावती–बडनेरा मार्गावर रविवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात (Accident) वडील आणि मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गजाननराव माकोडे हे आपल्या मोठ्या मुलगी सपना हिला पुण्याला जाणाऱ्या बसमध्ये बसवण्यासाठी दुचाकीवरून सोडायला निघाले होते. त्यांच्यासोबत दुसरी मुलगी प्रियंका देखील होती. सोमवारी सकाळी सपनाला पुण्यात नोकरीवर रुजू व्हायचे होते, त्यामुळे रात्री सुमारे 12:10 वाजता ते एमआयडीसीकडे निघाले होते.
एमआयडीसी क्रॉसिंगवर रस्ता ओलांडताना अमरावतीकडून बडनेराकडे येणाऱ्या वेगात असलेल्या एका XUV कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेचा वेग इतका होता की तिघेही सुमारे 40 फूट अंतरावर फेकले गेले. या अपघातात गजाननराव माकोडे यांचा जागीच मृत्यू झाला, तर सपना हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रियंका गंभीर जखमी असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या धडकेत दुचाकीचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि पंचनामा करून पुढील कारवाई सुरू केली. कार चालक मद्यधुंद अवस्थेत होता आणि वेगही जास्त असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या घटनेमुळे माकोडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सोमवारी दुपारी वडील आणि मुलीची अंत्ययात्रा एकाच वेळी निघाली, तेव्हा उपस्थितांचे डोळे पाणावले. ज्या मुलीच्या आयुष्याची नवीन सुरुवात होणार होती, तिच्यावर वडिलांसोबतच अंत्यसंस्कार करण्याची वेळ कुटुंबावर आली.
दरम्यान, अपघातानंतर कार चालक काही काळ घटनास्थळावरून निघून गेला होता. नंतर त्याने स्वतः पोलीस ठाण्यात हजर होत माहिती दिली. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.







