नागपूर : कर्जाची परतफेड करण्यासाठी एका आईनेच आपल्या १८ वर्षीय मुलीवर सावकाराकडे जाण्यासाठी दबाव टाकल्याचा धक्कादायक प्रकार इमामवाडा परिसरात समोर आला आहे. एवढेच नव्हे, तर मुलीला जबरदस्तीने विवस्त्र करून तिचे फोटो आणि व्हिडीओ काढून ते सावकाराला पाठवल्याचा गंभीर आरोप मुलीने केला आहे. या प्रकरणी इमामवाडा पोलीस ठाण्यात आईविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित महिलेने एका सावकाराकडून कर्ज घेतले होते. कर्जाची रक्कम परत करण्यासाठी सावकाराकडून तिच्यावर सातत्याने दबाव आणला जात होता. या दबावातून महिलेने आपल्या मुलीवर सावकाराच्या मागण्या मान्य करण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केल्याचे तक्रारीत नमूद आहे. सावकार सांगेल तसे करायचे, असे आईने मुलीला सांगितल्याचा आरोप आहे.

मुलीने याला विरोध केला. मात्र, आईने तिच्यावर जबरदस्ती केल्याचा आरोप आहे. मुलीला विवस्त्र करून तिचे फोटो आणि व्हिडीओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड करण्यात आले आणि ते संबंधित सावकाराला पाठवण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यासोबतच स्वतःला काहीतरी करून घेण्याची धमकीही आईने दिल्याचा आरोप मुलीने केला आहे.

आईकडून होणारा मानसिक आणि शारीरिक त्रास वाढल्यानंतर मुलीने अखेर वडिलांना संपूर्ण प्रकार सांगितला. मुलीची आपबिती ऐकून वडिलांनी तिला सोबत घेत इमामवाडा पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आईविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला.
दरम्यान, या प्रकरणात मुलीवर दबाव आणणारा सावकार कोण आहे, याचाही पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. कर्जाच्या वसुलीसाठी मुलीचा वापर करण्याचा प्रयत्न नेमका कशा प्रकारे झाला, तसेच या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिस करत आहेत. घटनेमुळे नागपूरमध्ये संताप व्यक्त होत असून, तपासानंतर या प्रकरणातील पुढील बाबी स्पष्ट होणार आहेत.







