नागपूर : आईचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. वडिलांनी दुसरे लग्न केले. सावत्र आई आणि घरच्या कुणाशीही बोलावेसे वाटत नाही म्हणून १५ वर्षीय मुलीने घरातून काढता पाय घेतला. पोलिसांनी तिचा शोध घेतला. तिची समजूत काढली. सोनेगाव पोलीस ठाण्यांतर्गत ही धक्कादायक घटना उघडकीस आली.
२५ ऑगस्टला सकाळी ११ वाजता मुलीने टोकाचे पाऊल उचलले. ती कुठेही सापडत नसल्याचे पाहून आजोबांनी (७२) सोनेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी नोंद घेत तपास सुरू केला. समांतर गुन्ह्याच्या तपासात गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाला ती सोनेगाव हद्दीत गवसली. विचारपूस केली असता तिने पोलिसांसमोर आपले मन मोकळे केले. तिला सावत्र आई आहे.
तिच्या सख्ख्या आईचे दोन वर्षांपूर्वीच निधन झाले. तेव्हापासून तिचे मन कुठेच रमत नव्हते. घरी सगळे आहेत. परंतु, त्यांच्याशीही बोलावेसे वाटत नव्हते म्हणून तिने घरातून निघून जाण्याचा निर्णय घेतला. मुलीच्या मनाची व्यथा ऐकून पोलीसही गंभीर झाले. त्यांनी आपुलकीने तिची समजूत काढली. समुपदेशन करून तिला सोनेगाव पोलिसांच्या सुपुर्द केले. पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल, सहपोलीस आयुक्त अश्वती दोरजे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) संजय पाटील, पोलीस उपायुक्त (डिटेक्शन) राहुल माकणीकर, सहपोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकातील पोलीस निरीक्षक ललिता तोडासे, राजेंद्र अटकाळे, श्याम अंगुथलेवार, ऋषिकेश डुमरे व वैशाली किन्हीकर यांनी या मुलीचा शोध घेतला.