नागपूर: महाराष्ट्रातील गडकिल्ले, प्राचीन वारसास्थळी मद्यपान करणाऱ्या तसेच या वास्तूंचे नुकसान करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी राज्य सरकारने कायदेशीर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. गडकिल्ल्यांवर मद्यपान करणाऱ्यांना १ लाख रुपयांचा दंड व दोन वर्षांच्या तुरुंगवासांची तरतूद करणारे विधेयक सोमवारी विधानसभेत मांडण्यात आले.
नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात ‘महाराष्ट्रातील प्राचीन स्मारके आणि पुराणवस्तुशास्त्रविषयक स्थळे आणि अवशेष सुधारणा’ हे विधेयक विधिमंडळात सादर करण्यात आले. त्यात गडकिल्ल्यांचे पावित्र्य भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. हे सुधारणा विधेयक कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत सादर केले.
विधेयकाविषयी माहिती देताना ते म्हणाले, गडकिल्ल्यांवर दारू पिणे, तेथील पुरातन वास्तूंचे नुकसान करणे असे प्रकार सर्रास घडू लागले आहेत. त्यास आंतापर्यंत कायद्यामध्ये शिक्षा करण्याची तरतूद नव्हती. आता एक लाख रुपये दंड आणि दोन वर्षांची शिक्षा अशा प्रकारच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे गडकिल्ल्यांचे पावित्र्य भंग करणाऱ्यांमध्ये धाक निर्माण होईल. याआधी असा गुन्हा करणाऱ्यांना १ वर्ष कारावास आणि १० हजार रुपये दंडांची शिक्षा होती.
बेकायदा वृक्षतोडीसाठी ५० हजारांचा दंड
बेकायदा वृक्षतोडीच्या दंडाची रक्कम एक हजार रुपयांवरून ५० हजार करण्यात येणार आहे. यासंदर्भातील विधेयक सोमवारी विधानसभेत सादर करण्यात आले. हे विधेयक पावसाळी अधिवेशनात मांडण्यात आले होते. आता पुन्हा एकदा ते सुधारणेसह मांडण्यात आले आहे. बेकायदा वृक्षतोडीसंदर्भात १९६७ च्या कायद्यानुसार एक हजार रुपयांचा दंड आकारला जातो. त्यात नंतरच्या काळात कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती. १९६७ च्या एक हजार रुपयांचे आजचे मूल्य ५० पट वाढले असल्याने यापुढे बेकायदा वृक्षतोडीला पन्नास हजार रुपये दंड आकारला जाईल.