Uddhav Thackeray मुंबई : मुंबई महापालिका वार्ड रचनेसंदर्भात शिवसेना उद्धव ठाकरे गटाने दाखल केलेली याचिका सोमवारी उच्च न्यायालयाने फेटाळली. यामुळे उध्दव ठाकरे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. न्यायालयाने याचिका फेटाळाल्याने 227 प्रभाग कायम राहणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
227 प्रभागांची जुनी प्रभागरचना कायम…!
महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना मुंबई महापालिका प्रभाग पुनर्रचना करण्यात आली होती. यावेळी पालिकेच्या प्रभागांची संख्या वाढवून ती 227 वरुन 236 करण्यात आली होती. मात्र महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर शिंदे-फडवणीस सरकारने मविआ सरकारच्या काळातील ही प्रभागरचना रद्द केली आणि 227 प्रभागांची जुनी प्रभागरचना कायम केली.
त्यानंतर शिंदे-फडवणीस सरकारच्या या निर्णयाविरोधात शिवसेना (ठाकरे गट) कार्यकर्ते माजी नगरसेवक राजू पेडणेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी केली होती.
या याचिकेवर सोमवारी उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी उच्च न्यायालयाच्या न्या सुनील शुकरे आणि न्या एम डब्लू चांदवाणी खंडपीठाने पेडणेकर यांची याचिका फेटाळून लावली. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारने लागू केलेली जूनीच प्रभागरचना आता कायम राहणार असून मविआ सरकारच्या काळात प्रभागरचना बदलून 236 प्रभागांएवजी 227 प्रभाग असणार आहेत