मुंबई : येत्या दोन दिवसांवर गणरायाचे आगमन येऊन ठेपले असून या साठी मोठ्या प्रमाणात नागरिक कोकणात निघाले आहे. मुंबईत कामानिमित्त आणि व्यवसायानिमित अनेक कोकणवासी स्थायिक झाले आहे. असे असले तरी दरवर्षी हे नागरिक गणेशोत्सवासाठी गावी जात असतात. यामुळे आज सकाळ पासून मुंबई कोकण मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. वाहनांच्या तब्बल 5 ते 7 किमी रांगा लागल्या आहेत.
आज सकाळपासून मुंबई-कोकण महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. या वाहतूक कोंडीमुळे प्रवाश्यांचेही हाल होत आहेत. ट्रॅफिक सुरळीत करताना पोलीसांनाही मोठी कसरत करावी लागत आहे. गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर मुंबई, सुरत, अहमदाबाद, वांद्रे, पनवेल वरुन 310 विशेष गाड्या सुटणार आहेत. गावी जाण्यासाठी प्रवाशांनी मोठी गर्दी केली असून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी जवळपास 150 रेल्वे सुरक्षा बल कर्मचारी अधिकारी तैनात करण्यात आले आहेत, तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी यात्री सहाय्यक तैनात करण्यात येणार आहेत.
गणेशोत्सवासाठी चाकरमानी कोकणात निघाले असतानाच यादरम्यान मुंबई गोवा महामार्गावर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या प्रवासात चाकरमान्यांना कोणताही त्रास होऊ नये, विशेषतः वाहतूक कोंडीची समस्या फार काळ टिकू नये यासाठी रायगड पोलिसांनी कंबर कसली आहे. महामार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.