मुंबई: राज्यातील अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत पहिल्या दोन फेर्या पूर्ण झाल्यानंतर अजूनही मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त राहिल्या आहेत. बीई/बीटेक अभ्यासक्रमासाठी एकूण 1 लाख 83 हजार 760 जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी दोन फेर्यांनंतर फक्त 64 हजार 841 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला असून तब्बल 1 लाख 18 हजार 919 जागा अद्याप रिक्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर आता तिसऱ्या फेरीला सुरुवात झाली असून, गुणवत्ता यादी गुरुवारी 21 ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटी सेलने दिली आहे.

पहिल्या फेरीत 2 लाख 17 हजार 330 उमेदवारांपैकी 1 लाख 44 हजार 776 विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली होती. मात्र त्यापैकी फक्त 34 हजार 931 विद्यार्थ्यांनीच महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित केला. दुसऱ्या फेरीत 1 लाख 83 हजार 760 जागांसाठी 1 लाख 89 हजार 277 विद्यार्थ्यांनी पर्याय नोंदवले होते. यातून 1 लाख 62 हजार 205 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला. पण या फेरीत केवळ 29 हजार 910 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला. त्यामुळे दोन फेर्यांनंतर एकूण 64 हजार 841 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. उर्वरित जागांवर अजूनही प्रवेशासाठी संधी उपलब्ध आहे.
सीईटी सेलच्या नियमानुसार, पहिल्या तीन पसंतींमध्ये महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना 12 ते 14 ऑगस्टदरम्यान प्रत्यक्ष जाऊन प्रवेश घेणे बंधनकारक होते. त्यानंतर शिल्लक राहिलेल्या जागांसाठी तिसऱ्या फेरीची प्रक्रिया सुरू झाली आहे. 16 ऑगस्ट रोजी तिसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात आली, तर 17 ते 19 ऑगस्ट या कालावधीत विद्यार्थ्यांना पसंतीक्रम नोंदणीची संधी देण्यात आली. यानंतर 21 ऑगस्टला गुणवत्ता यादी आणि तिसऱ्या फेरीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. प्रवेश निश्चित करण्यासाठी विद्यार्थ्यांना 22 ते 25 ऑगस्टदरम्यान संबंधित महाविद्यालयात प्रत्यक्ष जावे लागणार आहे.
तिसऱ्या फेरीनंतर अजूनही जागा रिक्त राहिल्यास 26 ऑगस्ट रोजी शेवटच्या फेरीसाठी जागांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही शेवटची संधी असेल.
दरवर्षी अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील मोठ्या प्रमाणातील जागा रिक्त राहणे ही चिंतेची बाब ठरत आहे. यामागे खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांची वाढती संख्या, अभ्यासक्रमाविषयीचा विद्यार्थ्यांचा कमी होत जाणारा कल, माहिती तंत्रज्ञान व अन्य क्षेत्रातील पर्यायी कोर्सकडे विद्यार्थ्यांचा ओढा अशी विविध कारणे सांगितली जात आहेत. यंदा पहिल्या दोन फेर्यांनंतर जवळपास दोन तृतीयांश जागा रिक्त राहिल्याचे चित्र असून, तिसऱ्या व शेवटच्या फेरीत किती प्रमाणात प्रवेश निश्चित होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सीईटी सेलने विद्यार्थ्यांना दिलेल्या माहितीनुसार, तिसऱ्या फेरीत ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप प्रवेश घेतलेला नाही त्यांना पुन्हा एकदा आपली पसंतीक्रम नोंदवण्याची आणि महाविद्यालय मिळवण्याची संधी मिळणार आहे. मात्र वेळापत्रकानुसार दिलेल्या मुदतीत प्रवेश प्रक्रिया पूर्ण न केल्यास त्यांना पुढील संधी गमवावी लागू शकते.







