लहू चव्हाण
पाचगणी : सरपंच परिषद, महाराष्ट्र राज्य पर्यटन व कला सांस्कृतिक कला महोत्सव समिती मुंबई व दक्ष नागरिक फाऊंडेशन सातारा यांच्या वतीने सातारा येथे ७४ व्या गणतंत्र दिवसानिमित्त संविधान जनजागृती कार्यक्रम अंतर्गत भिलार (ता. महाबळेश्वर) येथील हिलरेंज एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका तेजस्विनी भिलारे यांना भारतीय संविधान जनजागृती रक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमात सरपंच परिषदेचे अध्यक्ष आ. नितीन काका पाटील, महाराष्ट्र राज्य पर्यटन व कला समितीचे सह समन्वयक मनोज सोनवणे, दक्ष नागरिक फाउंडेशनच्या सुनिता पाटणे, निलिमा भिंताडे, महेश गाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुस्तकांचे गाव भिलार येथील तेजस्विनी जतिन भिलारे यांना शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल दि.६ फेब्रुवारी रोजी सातारा येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
भिलारे यांना भारतीय संविधान जनजागृती रक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्यावर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
वाई-खंडाळा-महाबळेश्वर मतदार संघाचे जननायक आमदार मकरंद पाटील, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे, हिलरेंज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीन भिलारे, माजी सभापती राजेंद्र भिलारे, समन्वय समितीचे माजी अध्यक्ष प्रवीण भिलारे, भिलारचे सरपंच शिवाजीराव भिलारे आदींसह राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी तेजस्विनी भिलारे यांचे प्रत्येक्ष भेटून व भ्रमणध्वनीवरून अभिनंदन केले.
यावेळी तेजस्विनी भिलारे म्हणाल्या या पुरस्काराने सामाजिक जबाबदारी वाढली असून अधिक काम करण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे.