सिंधुदुर्ग : राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु असून प्रचाराचा अंतिम टप्पा सुरु आहे. महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या बुधवारी (दि. 20) मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. अशातच अनेक राजकीय घटना घडताना दिसत आहेत. यादरम्यान, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याची घोषणा केली आहे. तुळस येथे पत्रकार परिषद घेत त्यांनी ही माझी शेवटची निवडणूक आहे, असे जाहीर केले आहे. तसेच माझी मुलगी सोनाली ही माझा राजकीय वारसदार नाही, लवकरच माझा वारसदार ठरेल, असे केसरकर म्हणाले.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने दिपक केसरकर यांना सावंतवाडी मतदारसंघातून निवडणुकीच्य रिंगणात उतरवलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेवदवार दीपक केसरकर यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. या सभेतून दीपक केसरकर यांनी यापुढे माझ्या घरातील कोणीही राजकारणात येणार नाही, अशी घोषणा केली होती.
पुढे बोलताना दीपक केसरकर म्हणाले, देशात चुकीची परंपरा झाली. खोटं बोलून नेरेटीव्ह सेट केला जात आहे. गेल्या 15 वर्षात मी काय काम केलं, यावर प्रश्न उपस्थित केले जात होते. मी गेल्या 5 वर्षात 2500 कोटी रुपयांचा निधी आणला. उद्धव ठाकरे सावंतवाडीत येऊन काय बोलतात, साईबाबांबद्दल बोलतात. मात्र साईबाबांनी आशीर्वाद दिले म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. अन्यथा उद्धव ठाकरे कधीही मुख्यमंत्री झाले नसते, अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरेंवर केली.
दरम्यान, ऐन विधानसभेचा प्रचार संपत आला असतानाच दीपक केसरकर यांनी ही मोठी घोषणा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.