शिर्डी : शिर्डी येथील साईबाबांच्या चरणी हैद्राबाद येथील साईभक्त महिलेने पतीच्या स्मरणार्थ २३३ ग्रॅम वजनाचे १२ लाख १७ हजार रुपये किंमतीचे सुवर्णफुल अर्पण केले आहे.
नागम अलिवेणी असे साईबाबांच्या चरणी सुवर्णफुल अर्पण करणाऱ्या महिलेचे नाव आहे.
तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथील साईभक्त नागम अलिवेणी मंगळवारी शिर्डीत पोहचल्या. त्यानंतर त्यांनी साईबाबा समाधीचे मनोभावे दर्शन घेतले आणि त्यांच्या पतीच्या स्मरणार्थ २३३ ग्रॅम वजनाचे १२ लाख १७ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे फुल साईबाबा संस्थानला देणगी स्वरुपात दिले आहे.
हे सुवर्ण फुल त्यांनी साईबाबा संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी साईबाबा संस्थानच्या वतीने दानशूर साईभक्त महिला नागम अलिवेनी यांचा सत्कार करण्यात आला.
देश विदेशातून येणाऱ्या हजारो भक्तांकडून साईबाबा मंदिरात विविध दान दिले जाते. श्रद्धा-सबुरीचा संदेश देणाऱ्या शिर्डीतील साईबाबांच्या झोळीत दान देणाऱ्या भक्तांची संख्या काही कमी नाही.
दरम्यान, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच लाखो रुपये किंमतीचे सोने साईबाबांच्या चरणी प्राप्त झाले आहे. तसेच काही दिवसांपूर्वी हैदराबाद येथीलच एका साईभक्त महिलेने साईबाबांच्या चरणी सुवर्ण माला अर्पण केली होती.