अजित जगताप
Satara News | वडूज : खटाव तालुक्याचे ठिकाण असलेल्या वडूज नगरी मधील कष्टकरी- शोषित- दलित- शेतमजूर यांची वस्ती असलेल्या प्रभाग क्रमांक चार मध्ये गेली आठवडभर पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांचा बांध फुटला. भर उन्हात आंदोलनाने रक्त आठवल्यानंतर अखेर खटावचे तहसीलदार किरण जमदाडे यांनी आंदोलकांची भेट घेऊन पाण्याचा प्रश्न निकाली काढतो. असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन स्थगित केले. यावेळी नगरपंचायत हतबलता पहाण्यास मिळाली.
वडूज नगरीतील इंदिरानगर, आदिनाथ नगर, सिद्धार्थ नगर या ठिकाणी ६०० ते ८०० कुटुंबीय राहत आहेत. या कुटुंबीयांना नागरी सुविधांबाबत दुधाभाऊ केला जातो. त्यामुळे या ठिकाणी नागरिकांना नागरी सुविधा मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. गेली आठवडाभर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा या ठिकाणी झाला नसल्याने आंदोलकांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आली.
या वेळेला महादेव सकट, डॉ. नारायण बनसोडे, अजित नलवडे, प्रतीक बडेकर, गणेश गोडसे, प्रदीप खुडे, नगरसेविका शोभा बडेकर , अशोक बैले, अजित रायबोले, रणजीत गोडसे, सतीश बडेकर ,सोमनाथ खुडे, सचिन खुडे, श्रीकांत काळे, सचिन भोंडवे, निलेश जाधव, आनंदा दुबळे, दिनकर खुडे व सागर भिलारे आदी भर उन्हात रस्त्यावर उतरून रास्ता रोको केला.
प्रारंभी सकाळी वाहतूक रोखून धरली तरीही या आंदोलनाची कुणीही दखल घेतली नाही. त्यामुळे आंदोलन आक्रमक झाले होते. आंदोलनाची तीव्रता वाढत असल्याचे पाहून अखेर पोलीस दलानेच खटावचे तहसीलदार किरण जमदाडे यांना आंदोलन ठिकाणी आणले. काही काळ आंदोलक व प्रशासन यांच्यामध्ये पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर चर्चा झाली. त्यानंतर दुपारपर्यंत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला जाईल असे आश्वासन तहसीलदार किरण जमदाडे यांनी दिल्यानंतर आंदोलक रस्त्याच्या बाजूला झाले आणि पुन्हा वाहतूक सुरू झाली.
याबाबत प्रसारमाध्यमांनी वडूज च्या नगराध्यक्ष मनीषा काळे यांच्याशी साधला असता, जुनी पाईप नादुरुस्त झाली असल्याने पाणीपुरवठा करताना अडचण येत आहे. दुरुस्तीच्या कामासाठी संबंधित तांत्रिक कामगारांना सूचना दिली असून ते आल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल. असे सांगितले. परंतु, आंदोलकांनी स्वतः नगराध्यक्षांनीच आंदोलन स्थळी यावे अशी मागणी केली होती. यावेळी आंदोलकांनी कमिशन घेणारे हाय हाय व नगरपालिका नगरपंचायतीच्या विरोधात घोषणाबाजी केली.
पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाबाबत लोकांच्या भावना तीव्र झाल्या असून याबाबत प्रशासनाने योग्य ते मार्ग न काढल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. वडूज नगरीमध्ये मुख्याधिकारी नाही. घंटागाडी नाही. पाणी नाही. आता तर आंदोलकांच्या समोर येण्यास नगराध्यक्षांनी नकार दिल्यामुळे तो एक चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान, नागरी सुविधा उपलब्ध होत नसतील तर वडूज नगरपंचायत मान्यता रद्द करून पूर्वीसारखी वडूज ग्रामपचायतीतर्फे कारभार पाहण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न केला जाईल. असे काहींनी तीव्र भावना व्यक्त केल्या.