पुणे: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. अशात सामाजमाध्यमांवर नेत्यासाठी रात्रीचा दिवस करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. राज्यात अनेक ठिकाणी नेत्यांकडून पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांऐवजी आपल्या सगेसोयऱ्यांनाच तिकीट देताना दिसून येत आहेत. यामुळे पक्षांतर्गत नाराजी, मतभेद आणि ठिकठिकाणी गटबाजी उफाळून येताना दिसत आहे. (Maharashtra Local Body Election)

‘या’ नेत्यांच्या नातेवाईकांना संधी
संगमनेर नगर परिषद: येथे विधान परिषदेचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे, तर महायुतीचे आमदार अमोल खताळ यांच्या भावजयी सुवर्णा खताळ निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. तसेच माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या पत्नी आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या भगिनी दुर्गा तांबे याही निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत.
हेही वाचा: जुगारात पत्नी हरला, दीर-सासऱ्यासह 8 जणांकडून सामुहिक बलात्कार; जबरदस्ती गर्भपात अन्…
चिखलदरा नगर परिषद:
आल्हाद कलोती , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चुलत मामेभाऊ, नगरसेवक पदासाठी रिंगणात उतरले आहेत.
खामगाव नगर परिषद:
राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी त्यांच्या वहिनी अपर्णा फुंडकर यांना नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात उतरवले आहे.
जामनेर नगर परिषद:
मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला आहे. राज्यस्तरावर मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या महाजनांची पत्नी स्थानिक पातळीवर लढणार असल्याने चर्चा होत आहे.
पुसद नगर परिषद:
राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनी नाईक यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
राहाता नगर परिषद:
येथे नगराध्यक्षपदासाठी ‘गाडेकर विरुद्ध गाडेकर’ अशी थेट लढत होणार आहे. महायुतीकडून डॉ. स्वाधिन गाडेकर, तर महाविकास आघाडीकडून धनंजय गाडेकर निवडणुकीच्या मैदानात आहेत.
फलटण नगर परिषद:
येथे निंबाळकर विरुद्ध निंबाळकर अशी थेट लढत होण्याची शक्यता आहे. माजी सभापती रामराजे निंबाळकर यांचे चिरंजीव अनिकेत निंबाळकर नगराध्यक्ष पदासाठी शिंदे गटाचे उमेदवार आहेत. तर रणजितसिंह निंबाळकर यांचे बंधू समशेरसिंह निंबाळकर भाजपकडून निवडणूक लढवत आहेत.
यवतमाळ नगर परिषद:
येथे आदिवासी विकास मंत्री अशोक वुईके यांच्या कन्या प्रियदर्शिनी वुईके यांना भाजपकडून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात आली आहे.
भुसावळ नगर परिषद:
येथे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे यांनी शेवटच्या दिवशी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांवर नातेवाईकांची निवड हा मुद्दा आता राज्यभर चर्चेत आला आहे. कार्यकर्त्यांच्या नाराजीचा हा सूर निवडणुकीच्या निकालांवर कितपत परिणाम करतो, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा: निवडणुकीच्या तोंडावर शासनाकडून मोठ्या योजनेची घोषणा! 15 लाख रुपये…





