Pune Accident : पुणे : शहरात मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवण्याचे प्रकार थांबण्याचे नाव घेत नाहीत. कल्याणी नगर येथील मोठ्या अपघातानंतरही अशीच निष्काळजीपणा दाखवणारी आणखी एक घटना समोर आली आहे. चांदणी चौक परिसरात एका मद्यधुंद बीएमडब्ल्यू चालकाने कारला धडक दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना 18 मार्च रोजी सकाळी सुमारे 7.30 वाजण्याच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, चांदणी चौक हा पुण्यातील अत्यंत वर्दळीचा भाग आहे. सकाळच्या वेळेत मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा सुरू असताना संबंधित चालक मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होता. त्याने एका कारला धडक दिल्यानंतरही परिस्थितीची गंभीरता लक्षात न घेता तो गाडीतच बसून राहिला. आश्चर्याची बाब म्हणजे अपघातानंतर तो सुमारे 10 ते 15 मिनिटे गाडीतच झोपून राहिल्याचे सांगितले जात आहे.

या घटनेमुळे परिसरात काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली. उपस्थित नागरिकांनी चालकाला जागे करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो शुद्धीत नसल्याचे दिसून आले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, मोठा अपघात टळल्याने नागरिकांनी दिलासा व्यक्त केला.
कल्याणी नगर येथील अपघातानंतर प्रशासनाने कडक कारवाईचे आश्वासन दिले होते. तरीही अशा घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी पुन्हा जोर धरत आहे.
या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून संबंधित चालकावर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. पोलिसांकडून या घटनेची चौकशी सुरू आहे.






