महाराष्ट्र: महाराष्ट्रात मराठी नववर्ष म्हणजे गुढीपाडवा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या विशेष प्रसंगी, महाराष्ट्रात कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या मंदिराच्या कळसावर गुढी उभारण्यात आली आहे. मंदिराच्या कळसावर गुढी उभारून त्याची पुजा करून ही चैतन्याची गुढी उभारण्यात आली आहे. कुलस्वामिनी मंदिरात पहाटे 5 वाजता आरती करुन गुढी उभारण्यात आली आहे. गुढीपाडवा हा सण मराठी नववर्षाची सुरुवात दर्शवितो आणि हिंदू कॅलेंडरच्या चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो. यानिमित्त मुख्य पुजारी महंत तुकोजी बुवा यांनी साखरेचा हार अर्पण केला आहे. याविशेष प्रसंगी भाविकांनी मंदिरात गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. तुळजाभवानीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. गुढीपाडव्यानिमित्त भाविकांना विशेष प्रसाद वाटण्यात आला आहे.
जाणून घ्या, गुढीपाडवा सणानिमित्त अधिक माहिती
गुढीपाडवा हा उत्सव गुढी उभारून साजरा केला जातो, फुले, पाने आणि इतर सजावटींनी सजवलेली गुढी ही चैतन्याचे प्रतिक मानली जाते आणि नवीन सुरवात दर्शवते. गुढी सामान्यतः घरे, मंदिरे आणि इतर सार्वजनिक ठिकाणी उभारली जाते. सणानिमित्त लोक दारासमोर सुंदर रांगोळी डिझाइन, फुले आणि इतर सजावटींनी घर सजवून हा दिवस आणखी खास बनवतात. दरम्यान या विशेष प्रसंगी, राज्यभरातील मंदिरे आणि घरांमध्ये विशेष पूजा आणि प्रार्थना करण्यात आल्या आहेत.
या खास प्रसंगी श्रीखंड, पुरणपोळी या सारखे पदार्थ बनवून आजचा खास दिवस साजरा करण्याची पद्धत आहे. या निमित्ताने राज्यभर सांस्कृतिक कार्यक्रम आणि मिरवणुका आयोजित करण्यात आल्या आहेत. पारंपारिक नृत्य, संगीत आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत. गुढीपाडवा हा केवळ नवीन वर्षाचा उत्सव नाही तर एकता आणि सौहार्दाचा संदेश देणारा सण आहे. हा काळ आनंदी होऊन नववर्षाचे स्वागत करण्याचा आहे.