संतोष पवार
मुंबई : आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी दोन वर्षे मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील आदिवासी विभागातील शिक्षकांसाठी हा मोठा दिलासा म्हणावा लागेल. राज्य सरकारकडून १ डिसेंबर २०१८ अन्वये ही विशेष भरती मोहीम राबविण्यात आली होती. यामध्ये नियुक्ती मिळालेल्या प्राथमिक शिक्षकाना ही मुदत देण्यात येत आहे.
शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाल्यापासून पुढील काळात त्यांना सेवाविषयक लाभ देण्यात येतील. ही मुदतवाढ केवळ एक वेळची बाब म्हणून देण्यात येत आहे. या मुदतवाढीनंतरही जे शिक्षक परीक्षा उत्तीर्ण होणार नाहीत, त्यांच्या सेवा समाप्त करण्यात येतील, असा बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे २ वर्षाची मुदत देण्यात जरी आली असली तरी शिक्षकांना पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिर्वाय आहे.