पुणे : आज काही जिल्ह्यात वादळी वारासह वीजांचा कडकडाट सुरु आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्हे वगळता राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. काही जिल्ह्यांना यलो अलर्ट तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात अवकाळी पावसाचे वातावरण असले तरी मोठ्या प्रमाणात तापमान वाढले आहे. मुंबई आणि ठाण्यात उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहे. तर आज विदर्भात काही जिल्ह्यात तापमान ४० डिग्री सेल्सिअसच्या पुढे राहिले आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नगर, पालघर, जालना, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये मंगळवारी हवामानाचा कोणताही इशारा दिलेला नाही. राज्यातील उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस किंवा गारपीट होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. दक्षिण छत्तीसगडपासून विदर्भ वरील चक्राकार वारे, कर्नाटक ते दक्षिण केरळपर्यंत हवेचा कमी दाबातील पट्टा सक्रिय आहे. राज्यात पावसाला पोषक हवामान झाल्याने आज विदर्भातील नागपूर, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यांत वादळी पावसासह गारपिटीचा इशारा दिला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी वारे, विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
राज्यातील या जिल्ह्यांना आहे यलो अलर्ट
ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, यवतमाळ, सोलापूर, धाराशिव, लातूर, वाशीम, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.