मालवण : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (४ डिसेंबर) सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. सायंकाळी ४.१५ च्या सुमारास ते महाराष्ट्रात येतील. त्यानंतर, सिंधुदूर्ग येथे ‘नौदल दिन २०२३’ कार्यक्रमाला पंतप्रधान उपस्थित राहतील. भारतीय नौदलाच्या विशेष दलांची प्रात्यक्षिके पंतप्रधान सिंधुदुर्गातील तारकर्ली किनाऱ्यावरून पाहतील. पंतप्रधान प्रथमच सार्वजनिक कार्यक्रमासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार असल्याने कोकणवासियांची उत्सुकता वाढली आहे.
नौदलाचा प्रमुख कार्यक्रम तारकर्ली एमटीडीसीजवळ होणार आहे. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी यांच्यासह संरक्षणमंत्री राजनाथ सिंग हे उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह केंद्र व राज्यातील मंत्री, वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. नौदल प्रमुख अॅडमिरल आर. हरी कुमार पंतप्रधानांचे स्वागत करणार आहेत.
भारतीय नौदलाचे सर्वांत घातक मार्कोज कमांडो तब्बल आठ हजार फुटांवरून विमानातून पॅराशूटच्या सहाय्याने जमिनीवर झेपावणार आहेत. यापैकी एक प्रमुख कमांडो जमिनीवर उतरल्यावर मोदी यांना भारतीय नौदलाचे स्मृतिचिन्ह भेट म्हणून प्रदान करणार आहेत. त्यानंतर मान्यवरांची भाषणे होणार आहेत. नौदलाच्या कवायती संपल्यानंतर पंतप्रधान उपस्थितांना संबोधित करणार आहेत.
मालवणच्या या संपूर्ण परिसरात चिपी एअरपोर्टपासून ते तारकर्ली बीचपर्यंत आणि राजकोट किल्ल्यापर्यंत शिवसेनेकडून राज्य सरकारकडून आणि भाजपकडून जवळपास ४ हजार बॅनर्स लावण्यात आले आहेत. स्वच्छता, सुशोभिकरणावर भर दिला आहे. चोख सुरक्षाही बजावण्यात आली आहे.
नौदल दिन दरवर्षी ४ डिसेंबर रोजी साजरा होतो. यंदा हा सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन भूमीत सिंधुदूर्ग येथे साजरा होत आहे. दरवर्षी, नौदल दिनानिमित्त, भारतीय नौदलाची जहाजे, पाणबुड्या, विमाने आणि विशेष दलांद्वारे ‘कार्यान्वयन प्रात्यक्षिके’ आयोजित करण्याची परंपरा आहे. ही ‘कार्यान्वयन प्रात्यक्षिके’ लोकांना भारतीय नौदलाने हाती घेतलेल्या बहु-क्षेत्रीय मोहिमांचे विविध पैलू पाहण्याची संधी देतात. हे राष्ट्रीय सुरक्षेप्रती नौदलाच्या योगदानावर प्रकाश टाकते, तसेच नागरिकांमध्ये सागरी जनजागृतीचा प्रसारही करते.