जळगाव : धावत्या रिक्षा समोर अचानक कुत्रे आडवे आल्यामुळे रिक्षा उलटून झालेल्या अपघातात यशवंत डोके (वय ३५, रा. भुसावळ) हा तरुण ठार झाला. तर रिक्षातील इतर चार ते पाच प्रवासी गंभीर जखमी झाले. हा अपघात रविवारी दि. १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाजवळील हॉटेलसमोर झाला, जखमींवर डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात उपचार आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगावकडून भुसावळकडे जाणारी रिक्षा महामार्गावरील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासमोरुन जात होती. यावेळी अचानक रिक्षा समोर कुत्रे आडवे आले. त्यामुळे रिक्षा चालकाचे रिक्षावरील नियंत्रण सुटल्यामुळे रिक्षा उलटली. या अपघातात रिक्षातील प्रवासी यशवंत डोके हा तरुण जागीच ठार झाला, तर त्याच्यासोबत असलेले इतर चार ते पाच प्रवासी गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच नशिराबाद पोलीस ठाण्याचे कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत. जखमींना तात्काळ डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.