मुंबई : राज्यात सद्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडताना दिसून येत आहेत. अशातच आता मनोज जरांगे पाटील यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरच निशाणा साधला असून त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सगळं काही द्यायचं आहे, मग सगेसोयरे असेल किंवा आरक्षण असेल पण देवेंद्र फडणवीस हे मात्र ते होऊ देत नाहीत असा मनोज जरांगे यांनी आरोप केला आहे.
याबाबत देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आले होते. त्यावर, या आरोपाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच चांगल्याप्रकारे उत्तर देऊ शकतील, जर त्यांनी हे आरोप मान्य केले, तर मी राजकारणातून संन्यास घेईन, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. आता, फडणवीसांच्या प्रतिक्रियेनंतर पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना, एकनाथ शिंदे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच, मराठा आरक्षणाच्या प्रक्रियेत देवेंद्र फडणवीसांची भूमिका मोलाची आहे असे त्यांनी म्हटले आहे.
मनोज जरांगे यांच्याकडून होणाऱ्या आरोपाच्या प्रश्नावर उत्तर देत असताना देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव घेतलं. जर एकनाथ शिंदेंनी जरांगेचे आरोप खरे आहेत, असं म्हटलं तर मी राजकारणातून संन्यास घेईन असे थेट आव्हानच फडणवीसांनी दिलं होत. त्यावर, आता स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कडक शद्बात मराठा समाजासाठी आणि मराठा आरक्षणासाठी देवेंद्र फडणवीस यांचं योगदान सांगितलं आहे.
देवेंद्र फडणवीसांची मोलाची भूमिका होती.
मराठा समाजाला आरक्षण देताना, मी , देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एकत्र बसलो होतो. आम्ही विशेष अधिवेशन बोलवून मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिलं आहे. आपण मराठा आरक्षणाचा जो कायदा केला, त्यात देवेंद्र फडणवीस यांची महत्वाची भूमिका होती. न्यायाधीश शिंदे समिती आपण नेमली, मनोज जरांगे यांच्या मागणीनुसार मराठवाड्यात आपण कुणबी प्रमाणपत्रही देण्यास सुरुवात केली. ज्या सवलती होत्या, तेही देण्याचं काम केलं आहे. आम्ही मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणास विरोध करण्यासाठी न्यायालयात कोण गेलं आहे?, हेही अगोदर पाहावे, त्यातही विरोधी पक्षाचाच हात असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
मराठा आरक्षणाच्या निर्णयात देवेंद्र फडणवीसांची मोलाची भूमिका आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना देखील त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम केलं होतं. त्यावेळीही मी मंत्री होतो आणि त्या समितीमध्ये होतो. त्यामुळे देवेंद्रजी मराठा समाजाला विरोध करतात असं म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे. त्यामध्ये, कुठलंही तथ्य नाही, हा खोटा आरोप आहे. असे म्हणत मनोज जरांगे यांच्याकडून होत असलेल्या आरोपावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही रोखठोक भूमिका मांडली.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते..?
मनोज जरांगे पाटलांचं माझ्यावर विशेष प्रेम आहे. पण हे देखील मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे की राज्याचे सगळे अधिकार हे मुख्यमंत्र्यांकडे असतात, इतर सगळे मंत्री मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या अधिकाऱ्यांवर त्या ठिकाणी काम करत असतात आणि मी तर त्याच्या पुढे जाऊन म्हणेल, कारण शिंदे साहेब आणि मी एकत्रितपणे काम करतो. शिंदे साहेबांना पूर्ण पाठिंबा आणि पाठबळ माझं आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर माझं मत आहे की त्यांनी शिंदे साहेबांना विचारावं आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी जर असं म्हटलं की मराठा आरक्षणाकरिता कुठलाही निर्णय घ्यायचा त्यांनी प्रयत्न केला आणि तो प्रयत्न मी थांबवला, तर त्या क्षणी माझ्या पदाचा राजीनामा देईन आणि राजकारणातून देखील निवृत्त होईन.