नाशिक: महाराष्ट्र सरकारने लागू केलेल्या धर्मांतरणविरोधी कायद्यांतर्गत नाशिक शहरात पहिला गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणीचे अल्पवयीन असतानापासून लैंगिक शोषण केल्याचा, अश्लील फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून ब्लॅकमेल केल्याचा तसेच लग्नासाठी धर्मांतराचा दबाव टाकल्याचा आरोप एका तरुणावर करण्यात आला आहे. या तक्रारीनंतर आरोपी अमन अफसर खान याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता, पोक्सो कायदा आणि धर्मांतरणविरोधी कायद्यांतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार तरुणीच्या म्हणण्यानुसार, २०२१ मध्ये ती अकरावीत शिक्षण घेत असताना तिची आरोपीशी इन्स्टाग्रामवरून ओळख झाली. त्यानंतर आरोपी तिच्या संपर्कात राहू लागला. त्याच काळात तिच्या वडिलांचे निधन झाल्याने ती मानसिकदृष्ट्या खचली होती. या परिस्थितीचा गैरफायदा घेत आरोपीने लग्नाचे आश्वासन देत तिच्याशी जवळीक वाढवली. तक्रारीनुसार, ती १६ वर्षांची असतानाच आरोपीने तिला नाशिकमधील एका लॉजवर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतरही लग्नाचे आश्वासन देत विविध ठिकाणी तिचे शोषण केल्याचा आरोप आहे.

तरुणी वयात आल्यानंतर तिने आरोपीकडे लग्नाबाबत विचारणा केली. त्यावेळी लग्न करायचे असल्यास तिला आणि तिच्या कुटुंबीयांना धर्मांतर करावे लागेल, अशी अट आरोपीने घातल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. आरोपीच्या दबावामुळे तरुणीने धर्मांतर केले आणि त्यानंतर तिच्यावर बुरखा घालण्यासह काही निर्बंध लादण्यात आल्याचे तिने पोलिसांना सांगितले. मात्र, त्यानंतरही आरोपीने तिच्याशी लग्न केले नाही. उलट विविध ठिकाणी बोलावून तिच्यावर अत्याचार सुरूच ठेवल्याचा आरोप आहे.

दरम्यान, आरोपीने तरुणीचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ तयार करून ते सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. हे फोटो आणि व्हिडिओ हटवण्यासाठी आरोपीने पाच लाख रुपयांची मागणी करत तिला ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे. तरुणीने संबंध तोडण्याचा प्रयत्न केल्यानंतरही आरोपीकडून फोन करून त्रास दिला जात असल्याचे तिने सांगितले आहे. २५ जून २०२५ रोजी जबरदस्तीने भेटीस बोलावून पुन्हा अत्याचार केल्याचा, तसेच २८ सप्टेंबर रोजी पैशांची मागणी करत धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
सततच्या त्रासाला कंटाळून तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर भद्रकाली पोलीस ठाण्यात संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपीचा शोध सुरू असून, तक्रारीतील आरोपांची चौकशी करून पुढील कारवाई केली जाणार आहे.






