दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन करण्यासाठी गेलेल्या कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना वैयक्तिक आयुष्यात मोठा धक्का बसला आहे. दिल्ली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या आजी सावित्रीबाई शंकरराव दीपके यांचे निधन झाल्याची माहिती देण्यात आली. या घटनेमुळे अभिजीत दीपके यांच्यासमोर आंदोलनात सहभागी राहायचे की आजीच्या अंत्यसंस्कारासाठी गावी जायचे, असा पेच निर्माण झाल्याचे वृत्त आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अभिजीत दीपके हे आंदोलनासाठी मुंबईहून दिल्लीला रवाना झाले होते. त्यांचे विमान दिल्ली विमानतळावर दाखल होताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी १० ऑक्टोबर रोजी जंतरमंतर येथे आंदोलन करण्याचे कॉकरोच जनता पार्टीने जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती आहे. आंदोलनकर्त्यांना जंतरमंतरपर्यंत पोहोचण्यापूर्वीच रोखण्याची तयारी प्रशासनाने केली होती. यासाठी ३० हजारांहून अधिक पोलीस आणि निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आल्याचा दावा करण्यात आला असून, २० ताबा केंद्रांचीही व्यवस्था करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, अभिजीत दीपके यांच्या आजी सावित्रीबाई शंकरराव दीपके यांचे हिंगोली जिल्ह्यातील संतूक पिंपरी येथे शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास निधन झाले. त्या ८५ वर्षांच्या होत्या. गेल्या महिनाभरापासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती आणि त्यांच्यावर हिंगोली येथे उपचार सुरू होते. दीर्घ आजारामुळे त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.

आजीच्या निधनाची बातमी दिल्ली पोलिसांनी अभिजीत दीपके यांना दिल्याचे वृत्त आहे. त्यानंतर त्यांना आंदोलनात सहभागी राहायचे की अंत्यसंस्कारासाठी गावी जायचे, याबाबत निर्णय घेण्याचा पर्याय देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या घडामोडींमुळे अभिजीत दीपके यांच्या पुढील भूमिकेकडे लक्ष लागले आहे.






