पुणे : किल्ले रायगडावरील टकमक टोकावरून उडी मारून ठाण्यातील एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महाड तालुका पोलीस आणि शोध पथकाने संयुक्त कारवाई करत निजामपूरच्या बाजूला असलेल्या सुमारे 800 फूट खोल दरीतून त्याचा मृतदेह बाहेर काढला आहे.

मृत तरुणाचे नाव सुयोग पांचाळ (वय 37 वर्षे) असे असून तो ठाणे येथील रहिवासी होता. सुयोग शनिवारी रायगड किल्ल्यावर पोहोचला होता. तेथे गेल्यावर त्याने स्वतःच्या घरी फोन करून आत्महत्या करत असल्याचे सांगितले आणि त्यानंतर लागलीच मोबाईल बंद करून टाकला. या घटनेनंतर घाबरलेल्या कुटुंबीयांनी तत्काळ त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली.

सुयोगचा भाऊ सुवेल पांचाळ याला रायगडाच्या पायथ्याशी सुयोगची दुचाकी उभी असलेली आढळली. त्याने या घटनेची माहिती महाड तालुका पोलिसांना दिली. पोलिसांच्या मदतीने शोधमोहीम राबवण्यात आली. शनिवारी रात्री अंधार आणि दरीतील धोकादायक परिस्थितीमुळे हे काम थांबवण्यात आले होते. रविवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली.

दरीतील अत्यंत तीव्र उतार, दाट झाडी आणि धोकादायक वाटांमुळे पोलिसांसह बचाव पथक व स्थानिक नागरिकांसमोर मोठा अडथळा निर्माण झाला होता. अखेर ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने पाहणी केली असता टकमक टोकाखालील निजामपूरच्या बाजूला 800 फूट खोल दरीत त्याचा मृतदेह दिसून आला. पथकाने अत्यंत अडचणीच्या परिस्थितीत दरीत उतरून मृतदेह बाहेर काढला.
मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आला असून प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तो नातेवाईकांच्या स्वाधीन केला जाईल. सुयोगने हे टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून महाड तालुका पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे







