जळगाव : राज्याभरात काल (बुधवारी) मोठ्या उत्साहामध्ये मतदान पार पडले आहे. नागरिक, नेते, सेलिब्रिटी या सर्वांनी आपला मतदानांचा हक्क बजावला आहे. अशातच जळगाव जिल्ह्यात एका घरामध्ये दु:खाचे सावट असताना देखील कुटुंबप्रमुखाने आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले आहे. घरात पत्नीचा मृतदेह असताना राजेंद्र बच्छे यांनी मतदानकेंद्र गाठून मतदान केले आहे. त्यांच्यासोबत त्यांचे भाऊ गुलाब बच्छे व कुटुंबातील अन्य सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला.
याबाबत अधिक माहिती अशी की, कुटुंबावर एवढा दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना देखील राजेंद्र बच्छे यांनी मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडत नवा आदर्श घालून दिला आहे. त्यांनी बाजवलेल्या या कर्तव्यामुळे गावात त्यांच्या कुटुंबाचं कौतुक होत आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातल्या कळमडू गावातील शेतकरी राजेंद्र बच्छे यांच्या पत्नी छायाबाई बच्छे (वय 40) यांचे मतदानाच्या दिवशीच (बुधवारी) सकाळी सहा वाजण्यापूर्वी निधन झाले.
गेल्या चार महिन्यापूर्वीच बच्छे यांच्या मुलाची अग्निवीर म्हणून निवड झाली आहे. त्यासाठी तो बेळगाव (कर्नाटक) येथे प्रशिक्षणासाठी गेला आहे. त्यामुळे आईच्या अंत्यसंस्कारासाठी तो येऊ न शकल्याने बच्चे यांच्या मुलीने आपल्या आईच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले आहेत.
शनिवार (ता 23) मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत मतदारराजा कोणाला कौल देतो, राज्यात पुन्हा महायुतीचंच सरकार येतं की मविआ सत्ता स्थापन करेल? याकडे सगळ्याचं लक्ष लागलेलं आहे.