नाशिक: नाशिक शहरामध्ये शुक्रवारच्या मध्यरात्री एका खासगी डॉक्टरवर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पंचवटी परिसरातील सुयोग हॉस्पिटलमध्ये रात्रीच्या वेळेस ही घटना घडली. कैलास राठी असं हल्ला झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागातच डॉक्टर कैलास राठी यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. या हल्ल्याचे कारण अस्पष्ट असून हल्लेखोर मात्र फरार झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
डॉक्टरांवर हल्ला होण्याची ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वीही अशा प्रकारची घटना समोर आली होती. नाशिकमधील प्रख्यात नेत्ररोगतज्ज्ञ डॉक्टर प्राची पवार यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली होती. डॉक्टर प्राची पवार यांच्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच आणखी एका महिला डॉक्टरवर हल्ल्याची धक्कादायक घटना नाशिक शहरात घडली होती. एकाच हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका वॉर्डबॉयने महिला डॉक्टरवर प्राणघातक हल्ला केला होता, ज्यात महिला डॉक्टर गंभीर जखमी झाली होती. या प्रकरणी गंगापूर पोलिसांकडून वॉर्डबॉय अनिकेत डोंगरेला अटक करण्यात आली होती.