नाशिक: नाशिक शहरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे कंपनीच्या आवारात खेळताना पाण्याने भरलेल्या बादलीत पडून एका चार वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रागिणी मनोजकुमार वनवासी (रा. सुपरनेल इंडस्ट्रिअल, ग्लॅस्को बसस्टँडसमोर, एमआयडीसी अंबड) असे मृत बालिकेचे नाव आहे. हि घटना शनिवारी (दि. 22 मार्च) ला दुपारी घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चुमुरडीचे आई आणि वडील हे कुटुंबासह सुपरनेल कंपनीत वास्तव्यास आहेत. शनिवारी तिचे आई वडील नेहमीचे कामकाज करत होते. त्याचवेळी एका मोठ्या बादलीत रागिणी पाणी खेळत होती. खेळताना तिचा तोल गेला व ती बादलीत पडली. तिच्या नाक व तोंड पाणी गेल्याने तिचा श्वास गुदमरला. त्यामुळे ती बेशुद्ध झाली. कुटुंबाने तिची शोधाशोध केली असता चिमुरडी पाण्याच्या बादलीत पडल्याचे कुटुंबीयांना दिसले.
त्यानंतर तिला तत्काळ उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेमुळे नाशिक शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.