धुळे : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर येत आहे. सर्वपित्री अमावस्यानिमित्त तापी नदी पात्रात बेल पत्र टाकण्यासाठी गेलेल्या बहिण-भावांचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे. उत्कर्ष रमेश पाटील (वय 13), वैष्णवी सुरेश पाटील ( रा. सोनेवाडी) अशी मृत्यू झालेल्या बहिण-भावांची नावे आहेत. ही घटना शिंदखेडा तालुक्यातील सोनेवाडी येथील तापी नदीपात्रात घडली आहे.
नेमकं काय घडलं?
सर्वपित्री अमावस्यानिमित्त सोनेवाडी गावा जवळ असलेल्या तापी नदी पात्रात दोघे भाऊ बहिणी हे बेल पत्र टाकण्यासाठी गेले होते. यावेळी भाऊ उत्कर्ष याचा पाय घसरल्याने तो नदीपात्रात पडला. त्यावेळी भावाला वाचवण्यासाठी बहीण वैष्णवीने नदीपात्राकडे धाव घेतली. मात्र, भावाला वाचवण्याच्या प्रयत्नात पाण्याचा अंदाज आला नसल्याने ती देखील पाण्यात बुडाली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी नदीपात्राकडे धाव घेतली.
दरम्यान, नदीपात्रात दोघे चिमुकले बुडत असल्याचे पाहून वैष्णवीच्या काकांनी देखील दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाणी जास्त असल्याने त्या दोघांना वाचण्यात त्यांना यश आले नाही. नदी पात्रातून बाहेर काढल्यानंतर दोघांनाही शिंदखेडा ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्या दोघा बहिण भावांना मृत घोषित केले. या घटनेमुळे संपूर्ण शिंदखेडा तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.