जळगाव : जळगाव जिल्ह्यातून एक अपघाताची बातमी समोर आली आहे. बस आणि कारचा समोरासमोर भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात कार मधील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. चोपडा तालुक्यातील चोपडा-धरणगाव रस्त्यावर चोपडा सुत गिरणी जवळ ही घटना घडली आहे.
या अपघातात दोन सख्ख्या भावांचा तर त्यांच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. शैलेश श्रीधर वाणी (वय-३४), नीलेश श्रीधर वाणी (वय-३०) हे दोन भाऊ आणि त्यांच्यासोबत जितेंद्र मुरलीधर भोकरे (वय-४७) असं अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींची नाव आहे.
नेमकं काय घडलं?
धुळ्याच्या साक्री तालुक्यातील निजामपूर येथील वाणी कुटुंब हे जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील मनुदेवी माता मंदिर याठिकाणी नवरात्रीमध्ये दरवर्षी भंडारा देत असतात. त्यानुसार आज मंगळवारी सकाळी वाणी कुटुंबातील शैलेश श्रीधर वाणी, नीलेश श्रीधर वाणी हे दोन भाऊ आणि त्यांच्यासोबत जितेंद्र मुरलीधर भोकरे हे कारने मनुदेवी येथे भंडारा देण्यासाठी सकाळी मार्गस्थ झाले होते.
मात्र, चोपड्या पासून पाच किमी अंतरावर असलेल्या सूतगिरणी जवळ समोरून येणाऱ्या कार आणि बसचा जोरदार अपघात झाला. खराब रस्ता असल्याने कारचे आधी मागचे आणि नंतर पुढचे टायर फुटले. यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार समोरून येणाऱ्या बसवर जोरात आदळली.
यात मागे बसलेले शैलेश वाणी, नीलेश वाणी आणि जितेंद्र भोकरे या तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर चालक गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सध्या पोलिसांनी घटनास्थळ गाठत पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेने मृतांच्या कुटुंबियांवर दुखा:चा डोंगर कोसळला आहे.