नाशिक : येवला-लासलगाव मतदारसंघात आयोजित एका लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमाचे निमंत्रण अन्न नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांना न देणे संबधित ग्रामसेवकाच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. याप्रकरणी संबधित ग्रामसेवकावर जिल्हा परिषद प्रशासनाकडून निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे.
या प्रकारावरून मंत्री छगन भुजबळ यांनी माजी जिल्हा परिषद सदस्यांसह थेट जिल्हा परिषद प्रशासनाविरोधात विधानसभा अध्यक्षांकडे विशेषाधिकार भंगाची तक्रार दाखल केली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने संबंधित ग्रामसेवकाच्या निलंबनाचा प्रस्ताव तयार केला असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली.
२९ ऑगस्ट रोजी येवला मतदारसंघातील नांदूरमधमेश्वर येथे जिल्हा परिषद बांधकाम विभाग, एकात्मिक बालविकास विभाग यांच्या योजनेअंतर्गत अंगणवाडी इमारतीचा, तसेच जिल्हा परिषद आरोग्य विभागअंतर्गत प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी विधानसभा मतदारसंघाचे आमदार असूनही मंत्री भुजबळ यांना निमंत्रण नव्हते. या सोहळ्याला माजी जिल्हा परिषद सदस्या अमृता पवार व सुरेखा दराडे, तसेच ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक कार्यक्रमाला न बोलवून अवमान केल्याची तक्रार भुजबळ यांनी पत्राद्वारे विधानसभा अध्यक्षांकडे केली होती.
याबाबत ग्रामपंचायत विभागाने संबंधित लोकार्पण सोहळ्याच्या वेळी मतदारसंघातील आमदारांना न बोलावणे चुकीचे असल्याचा, तसेच लोकार्पण झाल्यानंतर संबंधित ग्रामसेवकाने तत्काळ अहवाल देणे आवश्यक असताना तो उशिरा दिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.