नाशिक : येथील इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या डब्ब्याखालून अचानक धूर निघाला. त्यावेळी प्रवासी घाबरुन गेल्यामुळे एकच गोंधळ उडाला होता.
अप मार्गाच्या गोदान एक्स्प्रेसच्या बोगीच्या खाली असलेले लायनर ओव्हर हीट होऊन घासल्याने हा धूर निघत असल्याचे मॅकेनिकने गाडीची तपासणी केल्यानंतर सांगितले. त्यामुळे, रेल्वे मॅकेनिकच्या सल्ल्यानंतर गाडी इगतपुरी स्थानकावर नेण्यात आली होती. मात्र, या घटनेनंतर प्रवाशांमध्ये चांगलीच धांदल उडाली होती.
त्यादरम्यान, गाडीतून अचानक धूर सुरू झाल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. काही प्रवाशांनी गाडीची चैन ओढून रेल्वेच्या लोको पायलटला सावधान केले तर, काहींनी गार्ड व रेल्वे चालकास घटनेची माहिती दिली. याबाबत माहिती मिळताच, गार्ड आणि ट्रेन चालकाने प्रसंगावधान राखत जागेवरच गाडी थांबवली. गाडी थांबताच सर्व प्रवासी पटरीवर उतरले. यावेळी, ट्रेनमधून खाली उतरण्यासाठी प्रवाशांची मोठी घाईघडबड पाहायला मिळाली.
गाडी इगतपुरी स्थानकात आल्यानंतर गाडीची बोगी लायनर दुरुस्त करुन पुन्हा मुंबईच्या दिशेने ट्रेनला रवाना करण्यात आली आहे. त्यामुळे, प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला.