नंदुरबार : राज्यात महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढत असून महिला वर्ग स्वतःला असुरक्षित समजू लागला आहे. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर राज्यात अनेक घटना घडल्याचे समोर आले आहे. अशातच आता नंदुरबारमध्ये १३ वर्षांच्या मुलीवर जन्मदात्या बापानेच लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलीची प्रकृती खराब झाल्यानंतर तिला डॉक्टरकडे नेण्यात आले, त्यावेळी हा सर्व प्रकार उघड झाला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे मुलगी गर्भवती राहिली असल्याची माहिती समोर येत आहे. शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे ही घटना घडली. आईच्या तक्रारीनंतर बापाविरोधात शहादा पोलिस ठाण्यामध्ये बाललैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी बापाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, १३ वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबीयांसोबत शहादा तालुक्यातील प्रकाशा येथे वास्तव्यास आहे. या मुलीवर बापानेच लैंगिक अत्याचार केले. त्यामुळे ती मुलगी गरोदर राहिली असल्याची माहिती मिळत आहे. पीडित मुलीच्या ४० वर्षीय बापाने एप्रिल २०२४ ते जुलै २०२४ दरम्यान स्वतःच्या अल्पवयीन मुलीशी राहत्या घरी ती एकटी असताना शारीरिक संबंध प्रस्तापित केले त्यामध्ये ती गर्भवती राहिली आहे.
ही घटना कोणाला सांगितली तर जीवे ठार मारण्याची धमकी सुद्धा बापाने आपल्या मुलीला दिली. त्यामुळे घाबरलेल्या मुलीने गप्प राहणे पसंत करून वडिलांकडून होणारा लैंगिक अत्याचार सहन करत राहिली. पण पोट दुखत असल्याने पीडित मुलीला तिची आई दवाखान्यात घेऊन गेली. पीडित मुलीची तपासणी केली असताना पीडित मुलगी गर्भवती असल्याचे कळताच डॉक्टरला सुद्धा धक्का बसला.
वडिलांनीच आपल्यावर अत्याचार केले..
पीडित मुलीला विचारणा केली असता वडिलांनीच आपल्यावर अत्याचार केल्याचे मुलीने रडत रडत सांगितले. मुलीने सांगितलेला धक्कादायक प्रकार ऐकून तिच्या आईला धक्का बसला. त्यानंतर संतप्त झालेली पीडित मुलीच्या आईने थेट शहादा पोलिस ठाण्यात धाव घेत नवऱ्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत आरोपीविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक सुद्धा केली. या घटनेमुळे नंदुरबारमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.